कीर्तिचा ‘रफ्तार’ 16 ऑक्टोबरला झळकणार
राजकुमार राव आणि कीर्ति सुरेशचा चित्रपट ‘रफ्तार’च्या निर्मात्यांनी आता याच्या प्रदर्शनाची नवी तारीख जाहीर केली आहे. रफ्तारच्या नव्या प्रदर्शन तारखेची घोषणा करताना राजकुमार रावने सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर केली आहे. स्वप्न साकार करण्यास वेळ लागतो, ‘रफ्तार’ केवळ एक चित्रपट नाही, तर चित्रपटसृष्टीत आमचे पहिले पाऊल आहे असे राजकुमारने म्हटले आहे. कीर्तिचा हा चित्रपट दसऱ्याच्या आसपास 16 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट भारतात वेगाने वाढणाऱ्या एड-टेक उद्योग म्हणजेच ऑनलाइन शिक्षण पुरविणाऱ्या स्टार्टअप बिझनेस जगतावर आधारित आहे. यश मिळविण्यासाठी पूर्णपणे झोकून देणाऱ्या महिला अन् पुरुषाची ही कहाणी आहे. मोठी महत्त्वाकांक्षा, पैसा आणि सत्तेची भूक मानवी नाते, प्रेम आणि प्रामाणिकतेला कशाप्रकारे प्रभावित करते हे या चित्रपटात दाखविण्यात येणार आहे. ‘रफ्तार’ चित्रपटात राजकुमार आणि कीर्ति हे मुख्य भूमिकेत आहेत. तर अनुराग ठाकूर, रोहन वर्मा, तान्या मानिकतला, रजत कपूर सहाय्यक भूमिकांमध्ये दिसून येतील. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य निंबाळकरने केले आहे. तर कहाणी रोहन नरुलाने लिहिली आहे. या चित्रपटाची निर्मिती राजकुमारची पत्नी पत्रलेखाकडून करण्यात आली आहे.