नवनिर्मितीच्या जोरावर साहित्याची शेकोटी सतत पेटती ठेवा !
डॉ.विनोद गायकवाड यांचे आवाहन : कोमपच्या शेकोटी संमेलनाचे केरी येथे उद्घाटन
प्रतिनिधी/ फोंडा
शेकोटीला आपल्या संस्कृतीमध्ये फार महत्त्व आहे. मराठी साहित्याची शेकोटी संत ज्ञानेश्वरांपासून पेटत आली आहे. आजच्या साहित्यिकांनी सतत नवनिर्मितीचा ध्यास घेऊन ती पेटती ठेवली पाहिजे. अशा संमेलनातून नवविचार आणि सृजनाची उर्जा सतत मिळत राहील, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विनोद गायकवाड यांनी केले.
कोकण मराठी परिषद, गोवा आयोजित 20 व्या शेकोटी साहित्य संमेलनाला काल शनिवारी सायंकाळी केरी-फोंडा येथील श्री विजयादुर्गा देवस्थानच्या सभामंडपात उत्साहात सुऊवात झाले. या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून डॉ. गायकवाड बोलत होते. देवस्थानचे सचिव मनोहर देसाई यांच्याहस्ते शेकोटी पेटवून संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कोमप सल्लागार मंडळाचे सदस्य सागर जावडेकर, कार्याध्यक्ष श्रद्धा खलप, अध्यक्ष नारायण महाले, सचिव चित्रा क्षीरसागर व खजिनदार रवींद्र पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.
आपल्या ओघवत्या विनोदी शैलीतून डॉ. विनोद गायकवाड यांनी मराठी साहित्य पंरपरेच्या प्रवाहाचा आढावा घेत अगदी संत साहित्यापासून आधुनिक साहित्याचे प्रयोजन सांगितले. संतानी गहन तत्त्वज्ञान आपल्या अभंग व अन्य रचनातून मांडताना समाजाला जगण्याचा मार्ग दाखविला. जगात अनंत दु:खे असली तरी अशुभाच्या छटा पुसून टाकण्याची ताकद साहित्यात असते. हाच विचार आधुनिक साहित्यात श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांपासून राम गणेश गडकरी, आचार्य अत्रे व पु. ल. देशपांडे यांनी मराठी साहित्यात ऊजविला. हे सांगताना त्यांनी साहित्यातील काही खुमासदार विनोदी किस्सेही श्रोत्यांपुढे मांडले.
मराठी भाषेचे महत्त्व आणि आज त्यावर झालेले इंग्रजीचे अतिक्रमण याचा उल्लेख करताना मराठी ही जगात सर्वाधिक बोलली जाणारी तिसऱ्या क्रमांकाची भाषा असल्याचे सांगितले. अंतकरणातून जी येते ती आपली भाषा असते. बंगालीने देशाला राष्ट्रगीत दिले, पण मराठीने विश्वगीत म्हणजेचे ‘पसायदान’ दिल्याचे सांगून हा अभिमान बाळगण्याचे आवाहन केले. सुखाचा त्याग, दु:खाचा भोग आणि विसंगतीचा योग असल्याशिवाय उत्तम साहित्य निर्मिती होऊ शकत नाही, असेही शेवटी त्यांनी नमूद केले.
गोव्याविषयी बोलताना गोवा ही सुंदर कविता असून सीमा नसलेल्या या प्रदेशात जागतिक संस्कृती नांदते. या सौंदर्याला अध्यात्माची जोड आहे. येथे फिश आणि फेणी नव्हे तर इश आणि वाणी नांदते असा गौरवोद्गार काढले. मनोहर देसाई म्हणाले, गोव्यातील मंदिरांनी येथील संस्कृती जपली. नाट्याकला वाढवली. येथील साहित्य आणि कलांना प्रोत्साहन देण्याची जबाबदारीही देवस्थानांची आहे. त्यामुळेच अशी संमेलने विजयादुर्गा देवस्थानामध्ये होणे याबद्दल विशेष आनंद असल्याचे सांगितले.
सागर जावडेकर यांनी प्रास्ताविक भाषणात अशा छोट्या संमेलनातून नवनिर्मितीला संधी आणि प्रोत्साहन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. साहित्य माणसाला जीवनाची वाट दाखवते. साहित्यातून पर्यावरणासारखे संवेदनशिल विषय पुढे येताना, आजच्या व उद्याच्या प्रश्नांवर विचार मंथन झाले पाहिजे. नवीन पिढीनेही अशा संमेलनातून प्रेरणा घेऊन आपल्यातील सृजनाला, भावनांना व्यक्त करण्याचा सल्ला दिला. श्रद्धा खलप यांनी अध्यक्षांचा परिचय तर नारायण महाले यांनी स्वागत केले. ग्रंथ दिंडीने संमेलनाची सुऊवात झाली. मानसी वाळवे यांनी सूत्रसंचालन तर शर्वा हुडेकर हिने ईशस्तवन सादर केले. उद्घाटनपूर्व सत्रात ‘साहित्य संस्था आणि समाज’ या विषयावर डॉ. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद झाला. त्यात प्रा. कृष्णाजी कुलकर्णी, अॅड. विलास कुवळेकर, कीर्तनकार सुहासबुवा वझे व जर्नादन वेर्लेकर यांचा सहभाग होता. मंगेश काळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.