शिक्षण खात्याच्या अखत्यारितच पदवीपूर्व महाविद्यालय ठेवा
पदवीपूर्व प्राध्यापक-कर्मचाऱ्यांची मागणी
बेळगाव : पदवीपूर्व महाविद्यालय जिल्हा पंचायतीच्या अखत्यारित आणू नयेत, यासंबंधीचा आदेश मागे घ्यावा, या मागणीसाठी पदवीपूर्व महाविद्यालयांचे प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत आपला विरोध दर्शविला. बेळगाव जिल्हा पदवीपूर्व महाविद्यालय कर्मचारी महामंडळ, पदवीपूर्व महाविद्यालय प्राचार्य संघ, पदवीपूर्व महाविद्यालय संघ व क्रीडा प्राध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले. अनेक वर्षांपासून पदवीपूर्व महाविद्यालय शिक्षण खात्याच्या अखत्यारित आहेत. मात्र, आता सरकारने पदवीपूर्व महाविद्यालय जिल्हा पंचायतीच्या अखत्यारित आणण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सध्या तीन परीक्षा घेतल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून हा निर्णय योग्य असला तरी या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी पदवीपूर्व महाविद्यालयांचे प्राध्यापक व कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली आहे. यावेळी बी. वाय. हळ्ळूर, एस. वाय. शानदाळ, पी. एस. कांबळे, वाय. एम. पाटील, आर. जी. मठ यांसह इतर उपस्थित होते.