केडीबीएतर्फे 13 जानेवारीला बॅडमिंटन संवाद कार्यक्रम
कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनने (केडीबीए) 51 व्या वर्षात पदार्पण केल्याच्यानिमित्त 13 जानेवारीला विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. या कार्यक्रमांसाठी प्रमुख अतिथी म्हणून माजी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण, महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे मानद सचिव श्रीकांत वाड, केंद्र सरकारचा नुकताच अर्जुन जीवनगौरव पुरस्कार जाहीर झालेले ज्येष्ठ दिव्यांग बॅडमिंटनपटू मुरलीकांत पेटकर हे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष सतिश घाटगे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
अधिक माहिती देताना घाटगे म्हणाले की, रेसिडेन्सी क्लबमध्ये सर्व कार्यक्रम होतील. सकाळी साडे दहा वाजता कोल्हापूरला बॅडमिंटनमध्ये पुढे नेण्यासाठी काय करावे लागेल, खेळाडूंचा डाएट, सराव, विश्रांती आणि बॅडमिंटनमधील लक्ष्य यासह विविध मुद्यांना डोळ्यासमोर ठेवून बॅडमिंटन संवाद या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. यामध्ये पदुकोण, वाड, पेटकर यांच्याकडून बॅडमिंटनपटूंना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. मार्गदर्शनानंतर प्रश्नोत्तराचाही कार्यक्रम होईल. तसेच सायंकाळी पाच वाजता रेसिडेन्सी क्लबमध्येच कोल्हापूर जिह्यातील आजी-माजी राज्य व राष्ट्रीय बॅडमिंटनपटूंचा सत्कार करण्यात येईल. यावेळी असोसिएशनने बनवलेल्या संकेतस्थळाचे अनावरण व असोसिएशनचा 50 पन्नास वर्षाचा आढावा घेणाऱ्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे. स्मरणिकेत बॅडमिंटनपटूंसाठी प्रेरणादायी ठरतील, असे लेखांना विशेष स्थान दिले आहे, असेही घाटगे यांनी यावेळी सांगितले.
एकाच जागी चार बॅडमिंटन कोर्ट उभारणार...
बाबासाहेब नाडगोंडे, हिंमतसिंह घाटगे, विक्रमसिंह घाटगे, बाबा भोसले, मेजर पी. वाय. सोवनी, सरदार मोमीन यांनी एकत्र येऊन पन्नास वर्षापूर्वी कोल्हापूर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनची स्थापना करत बॅडमिंटनचा कोल्हापूरात पाया रचला. असोसिएशनच्या माध्यमातून जिह्यात गेल्या पाच दशकात अनेक राज्य व राष्ट्रीय बॅडमिंटनपटू घडले. आता नव्या दमाच्या खेळाडूंसाठी असोसिएशनच्या कार्यकारिणीने 50 वर्षापूर्वी रचलेल्या बॅडमिंटनच्या पायावर कळस चढवण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून असोसिएशनने एकाच जागी चार बॅडमिंटन कोर्ट तयार करण्याचे ठरले आहे. क्रीडा संघटना व खेळाडूंच्या हितासाठी गतवर्षी स्थापन केलेल्या क्रीडा प्रतिष्ठानशी मोठी जागा मिळवण्यापासून ते जागेवर चार बॅडमिंटन कोर्ट उभारण्यासंदर्भातील चर्चा सुऊ ठेवली आहे. कोर्टवर खेळाडूंना सराव करता येईल. तसेच स्पर्धाही खेळवता येतील, अशा पद्धतीचे कोर्ट तयार करण्यात येईल, असे घाटगे यांनी यावेळी सांगितले.
पत्रकार परिषदेला असोसिएशनचे उपाध्यक्ष विनोद भोसले, सचिव तन्मय करमरकर, खजिनदार चंद्रशेखर सोहनी, सदस्य साईदास खणगाव यांच्यासह अऊणा रसाळ उपस्थित होत्या.