चंद्रशेखर राव भाजपशी मैत्री करण्याचा प्रयत्न करत आहे : तेलंगणामध्ये पंतप्रधान मोदींचा गौप्यस्फोट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (KCR) यांच्यावर निशाणा साधला. भारत राष्ट्र समितीने भारतीय जनता पक्षाशी जवळीक साधून मैत्री करण्याचा प्रयत्न करत असल्याचा गौप्यस्फोट केला.
तेलंगणा विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी महबूबाबाद येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरीकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, “केसीआर यांना भाजपची वाढती ताकद खूप आधीच कळली आहे. अनेक दिवसांपासून ते भाजपशी मैत्री करण्याचा प्रयत्न करत होते. एकदा दिल्लीत आल्यावर केसीआर यांनी मला भेटून तशी विनंतीही केली होती. पण तेलंगणातील लोकांच्या इच्छेविरुद्ध भाजप कधीही काम करू शकत नाही, असे आपण सांगितले" असा दावाही त्यांनी केला.
पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “भाजपने चंद्रशेखर राव यांना नकार दिल्यापासून भारत राष्ट्र समिती गोंधळून गेली आहे. भारत राष्ट्र समिती पक्ष मला शिवीगाळ करण्याची एकही संधी सोडत नाही. बीआरएसला माहीत आहे की मोदी आणि भाजपच्या जवळ कुठेही जाऊ देणार नाहीत. ही मोदींची हमी आहे.” असेही ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी अशा प्रकारचा दावा केल्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या महिन्यात मोदींनी निजामाबाद येथील सभेत सांगितले होते की केसीआर यांनी दिल्लीत त्यांची भेट घेतली आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सामील होण्याची इच्छा व्यक्त केली. हैदराबाद महापालिका निवडणुकीत भाजपने ४८ जागा जिंकल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या म्हणण्यानुसार ही बैठक झाल्याचा दावाही त्यांनी केला होता.
त्यावेळीही त्यांनी “हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीनंतर केसीआर मला दिल्लीत भेटायला आले आणि म्हणाले की त्यांना एनडीएमध्ये सामील व्हायचे आहे. त्यांनी मला पाठिंबा देण्याचीही विनंती केली. पण मी त्यांना (केसीआर) सांगितले की त्यांच्या अशा वागणुकीमुळे आपण त्यांच्याशी मैत्री करू शकत नाही.” मोदी म्हणाले होते.
महबूबाबाद येथील सभेत पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि केसीआर या दोघांवरही कडाडून टिका केली. या दोघांनाही ‘समान पापी’ म्हणत त्यांच्यावर हल्ला चढवला. तेलंगणाचा नाश करण्यात काँग्रेस आणि केसीआर हे दोघेही समान पापी आहेत. म्हणून, तेलंगणातील लोक एखाद्याला हाकलून दिल्यानंतर दुसरा आजार होऊ देणार नाहीत. मी हे राज्यात सर्वत्र पाहिले आहे. तेलंगणाची भिस्त भाजपवर आहे. तेलंगणाचा पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच असेल हे तुम्ही निश्चित केले आहे. भाजपने तुम्हाला वचन दिले आहे की, तेलंगणात भाजपचा पहिला मुख्यमंत्री हा मागासवर्गीय समुदायातील असेल.” असेही ते पुढे म्हणाले.