For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘केसीआर-बीआरएस’ची हॅट्ट्रिक हुकली!

05:06 AM Dec 04, 2023 IST | Tarun Bharat Portal
‘केसीआर बीआरएस’ची हॅट्ट्रिक हुकली
Advertisement

भाजपच्या जागांमध्ये तुलनेत वाढ : हैदराबादमधील काँग्रेस कार्यालयाबाहेर जल्लोष, आतषबाजी

Advertisement

तेलंगणात काँग्रेसने बहुमताचा टप्पा ओलांडला आहे. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, राज्यातील विधानसभेच्या एकूण 119 जागांपैकी काँग्रेस 64 जागांवर विजयी झाला आहे. तर बीआरएसला केवळ 39 जागांवर समाधान मानावे लागले. भाजपच्या जागा वाढून 8 झाल्या असल्या तरी दुहेरी आकडा गाठता आला नाही. विद्यमान मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव कामारेड्डी मतदारसंघातून निवडणूक हरले आहेत. त्यांचा भाजपच्या केव्ही रमणा यांनी पराभव केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री चेहरा रेवंत रेड्डी  ही याच जागेवरून निवडणूक लढवत होते. त्यांनाही येथून पराभवाचा धक्का बसला आहे. कामारेड्डी  यांच्याशिवाय मुख्यमंत्री केसीआर हे गजवेलमधून निवडणूक लढवत होते. गजवेल या पारंपरिक जागेवरून त्यांनी निवडणूक जिंकली. रेवंत रेड्डी यांनी कोडंगल आणि कामारेड्डी या दोन जागांवरून निवडणूक लढवली. त्यापैकी कोडंगलमधून विजयी झाले.

सुमारे दशकभर जुन्या सत्ताधारी पक्षाला सत्तेतून बाहेर काढण्याच्या उद्देशाने काँग्रेसने उत्साही निवडणूक मोहीम सुरू केली होती, तर भाजपनेही सत्ताधारी सरकारवर बिनधास्त हल्ला चढवला होता. इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनेही तेलंगणामध्ये सत्ताविरोधी लाट असल्याचे स्पष्ट केले होते. हैदराबादमध्ये ती फारशी प्रभावी नसली तरी तेलंगणाच्या दक्षिण, मध्य आणि उत्तर भागात सत्ताविरोधी लाट विशेषत: मजबूत असल्याचे निकालाअंती दिसत आहे. अलिकडेच शेजारच्या कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने मिळविलेल्या मोठ्या विजयाचे थेट पडसाद तेलंगणात उमटले. बीआरएसच्या नेतृत्त्वाखालील सरकारमध्ये बोकाळलेला भ्रष्टाचार, वाढता परिवारवाद, रेवडी प्रकरण यांचा फटका केसीआर यांना बसला आहे. दोनवेळा मुख्यमंत्री राहिलेल्या केसीआर यांच्यासाठी तेलंगणातील पराभव हा मोठा धक्का मानला जात आहे. केसीआर यांच्या पराभवामागे त्यांचा राष्ट्रीय राजकारणाकडे असलेला कल असल्याचे मानले जाते. केसीआर यांना स्वत:ला राष्ट्रीय नेता म्हणून प्रस्थापित करायचे होते, असे तज्ञांचे मत आहे. एवढेच नाही तर तेलंगणातील विजयाचा त्यांना विश्वास होता. आपला मुलगा केटी रामाराव यांना तेलंगणाच्या राजकारणात प्रस्थापित करण्याचा त्यांचा मानस होता. रामारावही त्यांच्या सरकारमध्ये मंत्री होते. पण केसीआर यांच्या या रणनितीचा या विधानसभा निवडणुकीत उलटा परिणाम झाला आहे. एकीकडे त्यांचे गृहराज्य तेलंगणातील सत्ता गेली, तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांना सोबत घेण्याचे त्यांचे प्रयत्नही यशस्वी होताना दिसत नाहीत.

Advertisement

घोडेबाजार टाळण्यासाठी फिल्डिंग

तेलंगणात सत्तेत येण्याची चिन्हे दिसताच काँग्रेसने हालचाली गतिमान केल्या. तेलंगणा प्रदेश काँग्रेसने राज्यातील संभाव्य विजयाच्या पार्श्वभूमीवर ताज हॉटेलमध्ये रूम बुक केल्या आहेत. कोणत्याही प्रकारचा घोडेबाजार होऊ नये म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आपल्या आमदारांना अन्यत्र हलविण्यासाठीही सकाळपासूनच धडपडत होते. विजयी झाल्यानंतर सर्व आमदारांना हैदराबादला येण्याच्या सूचना देण्यात आल्या. घोडेबाजाराच्या पार्श्वभूमीवर विजयी आमदारांना तात्काळ बेंगळूरला हलविण्याचेही नियोजन करण्यात आले. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याकडे याची जबाबदारी देण्यात आली होती.

मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये काँग्रेसला दाऊण पराभव पत्करावा लागला असेल, पण तेलंगणाच्या निकालांनी नक्कीच दिलासा दिला आहे. तेलंगणात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तेलंगणामधील निवडणूक प्रचाराची जबाबदारी कर्नाटकातील अनेक बड्या नेत्यांसह राष्ट्रीय नेत्यांनी सांभाळली असली, तरी काँग्रेसच्या विजयाचे मोठे श्रेय प्रदेशाध्यक्ष ए. रेवंत रेड्डी यांना देण्यात येत आहे. बीआरएसचा गड उद्ध्वस्त करण्यात रेवंत रेड्डी यशस्वी ठरल्याने त्यांना मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे.

तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ए. रेवंत रेड्डी तेलंगणात काँग्रेसच्या विजयाचा सर्वात मोठा हिरो म्हणून समोर आले आहेत. रेवंत रेड्डी  यांचा जन्म 1969 मध्ये अविभाजित आंध्रप्रदेशातील महबूबनगर जिह्यात झाला. उस्मानिया विद्यापीठातून पदवी घेत असताना ते विद्यार्थी राजकारणात सक्रिय होऊन अभाविपमध्ये सामील झाले. विद्यार्थी राजकारणानंतर त्यांनी मुख्य प्रवाहातील राजकारणात प्रवेश केला आणि चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षात प्रवेश केला. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी कोडंगल विधानसभा मतदारसंघातून टीडीपीच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. टीडीपीमध्ये त्यांचा दर्जा झपाट्याने वाढला. 2014 मध्ये पक्षाने त्यांना सभागृह नेते केले. 2017 मध्ये रेवंत रेड्डी यांनी टीडीपीला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी कोडंगल मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने मलकाजगिरी मतदारसंघातून तिकीट दिले होते. मोदी लाटेतही तेलंगणातून विजयी झालेल्या काँग्रेसच्या तीन खासदारांमध्ये त्यांचे नाव होते. 2021 मध्ये रेवंत रे•ाr यांना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली होती.

Advertisement
Tags :

.