Guru Purnima 2025: भारतीय बॉक्सिंग संघाच्या 3 प्रशिक्षकांपैकी एक गुरु कोल्हापूरचे!
प्रतिस्पर्धी खेळाडूंना एकमेकांच्या अंगावर जाण्यासाठी जोरदार प्रोत्साहन देतात
By : सुधाकर काशीद
कोल्हापूर : खेळ खेळताना इर्षेतून एकमेकांच्या अंगावर धावू नका, असाच संदेश क्रीडा क्षेत्रातील सर्व गुरु देत असतात. त्यातूनही खेळाडू एकमेकांच्या अंगावर गेले तर खेळ थांबवतात. कारवाईचा इशारा देतात, पण या खेळातले गुरु मात्र प्रतिस्पर्धी खेळाडूंना एकमेकांच्या अंगावर जाण्यासाठी जोरदार प्रोत्साहन देतात.
केवळ अंगावर जावे, असे नव्हे तर एकमेकांच्या तोंडावर ठोसा मारला तरी ‘और जोर से“ म्हणत आपल्या खेळाडूला बळ देतात. अर्थात बॉ क्सिंग किंवा मुष्ठीयुद्ध खेळाची ही पद्धत आहे. जगभर या खेळाची क्रेझ आहे आणि विशेष हे की भारतीय बॉक्सिंग संघाच्या तीन प्रशिक्षकांपैकी एक गुरु कोल्हापूरचे आहेत.
पाच दिवसांपूर्वी कझाकिस्तान येथे झालेल्या वर्ल्डकप बॉक्सिंग स्पर्धेतून 3 सुवर्ण, 5 रजत आणि 3 कांस्य अशी 11 पदके घेऊन भारतीय संघ परतला आहे. एवढी पदके घेऊन संघ परत आला तरी खूप कमी असे कौतुक या संघाच्या वाट्याला आले आहे. क्रिकेटमध्ये भारतीयांचा खूप रस आहे.
त्यामुळे भारतीय बॉक्सिंग संघाच्या या गुरूला ‘कृपया आम्ही म्हणजे भारतीय संघाने 11 पदके मिळवली आहेत. देशवासियांना ते कळू दे, यासाठी त्याची बातमी छापा’ अशी विनंती करावी लागते आहे. या संघाबरोबर गेलेले संघाचे तीन प्रशिक्षक आहेत. त्यापैकी जयसिंग पाटील हे करवीर तालुक्यातील खाटांगळे गावचे आहेत. ते भारतीय सेना दलात आहेत.
बॉक्सिंगशी गावात असताना त्यांचा कधीही संबंध आला नाही. पण सेना दलात बॉक्सिंग खेळता-खेळता ते जग फिरून आले. एका स्पर्धेत प्रतिस्पर्धी खेळाडूकडून डोळ्यावर मा र बसल्याने डोळ्यावर खूप मोठी शस्त्रक्रिया करावी लागली. त्यामुळे त्यांचा खेळ थांबला, पण ते भारतीय संघाचे गुरु म्हणून कार्यरत आहेत.
सेना दलाचा संघ देशात अव्वल आहे. या संघाला गुरु जयसिंग पाटील यांचे प्रशिक्षण आहे. पण भारतीयांना इतर खेळात इंटरेस्ट नाही. बॉक्सिंग तर खूपच लांब आहे. त्यामुळे यातील नामवंत खेळाडूंची समस्त भारतीयांनी दखल घ्यावी, ही या जयसिंग पाटील यांची अपेक्षा आहे.
सांगरूळ जवळच्या खाटांगळेसारख्या छोट्या गावातून त्यांचा प्रवास सुरू झाला. ते बीईजी स्पोर्ट्स म्हणून पाचवीपासून शिकू लागले. येथे घेतलेल्या मुलांना सैन्य दलात प्राधान्य दिले जाते. तेथे ते शिकले. अर्थात सैन्यात जवान म्हणून त्यांची निवड झाली. तेथे त्यांनी वेगळा खेळ म्हणून बॉक्सिंगला प्राधान्य दिले.
मुळातच धट्ट्याकट्ट्या जयसिंग पाटील यांना बॉक्सिंग संघातही संधी मिळाली. ते बॉक्सिंग स्पर्धेच्या निमित्ताने 34 देशांत सेना दलाच्यावतीने आणि प्रशिक्षक म्हणून फिरून आले. आता ते सेना दल आणि बॉक्सिंग संघाचे गुरु आहेत. त्यांच्या मते आपल्या भागातील तरुणात आक्रमकता गुण आहे, पण ही आक्रमकता बॉ क्सिंगमध्ये नियमाच्या चौकटीत बसून पाळावी लागते आणि ते सरावानंतर सहज शक्य आहे.
जयसिंग पाटील यांच्यासह धर्मेंद्र सिंग यादव हे मुख्य आणि अतीशम उद्दीन हे दोघे प्रशिक्षक आहेत आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट पुणे येथे खेळाडू घडवले जातात. नुकतीच कझाकिस्तानमध्ये वर्ल्ड बॉ क्सिंग स्पर्धा झाली आणि भारतीय संघाने या स्पर्धेत 3 सुवर्णपदकासह 11 पदकांची कमाई केली.
बॉक्सिंग म्हणजे बडवाबडवी नाही
"बॉक्सिंगमध्ये एकमेकाला ठोसे मारणे म्हणजे बडवाबडवी नाही. खूप शास्त्राrय कसोटीवर बॉक्सिंग खेळले जाते. अजूनही बॉक्सिंग म्हणजे धसमुसळा खेळ, अशीच देशवासियांना ओळख आहे. त्यामुळे या खेळाकडे तरुण वळत नाहीत. पण हा खेळ खूप वेगळा आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा परिसरात अजूनही धट्टेकट्टे तरुण आहेत. त्यांच्यात इर्षा जन्मत: आहे आणि मुळात याच गुणांवर बॉक्सिंग टिकून आहे. मुलामुलींनी जरूर या खेळाकडे वळावे."
- जयसिंग पाटील, प्रशिक्षक, भारतीय बॉक्सिंग संघ