Sangli Crime : चाकूचा धाक दाखवून दागिने लुटणारा आरोपी कवठेमहांकाळ पोलिसांच्या जाळ्यात
निसर्ग हॉटेलजवळ झालेल्या दरोड्याचा पोलिसांनी केला वेगाने उलगडा
कवठेमहांकाळ : चाकूचा धाक दाखवून दागिने लुटणाऱ्या आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. बोरगाव हद्दीत तासगाव रोडलगत निसर्ग हॉटेल जवळ २० नोव्हेंबर रोजी दुपारी झालेल्या जबरी दरोड्याचा तपास वेगाने करून कवठेमहांकाळ पोलिसांनी आरोपीला अटक केली असून एकूण ४० हजार रूपयेचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
फिर्यादी प्रिता तानाजी खोत (वय ५५, रा. विठुरायाचीवाडी) या २० नोव्हेंबर रोजी दुपारी आरेवाडी येथे जाण्यासाठी उभ्या असताना आरोपी आबा बाबासो शेळके (वय ४५, रा. वाशान ता. जत) याने त्यांना एम एच १० सी एस २६७३ मोटरसायकलवर बसवून सोडण्याचे आमिष दाखवले. मात्र कुची कॉर्नर कवठेमहांकाळ येथे न सोडता मोटरसायकल भरधाव वेगाने शिरढोणच्या दिशेने नेत आरोपीने चाकूचा धाक दाखवत बोरगावमधील माळाबर नेले. तेथे फिर्यादी यांना जिवे ठार मारण्याची धमकी देत त्यांच्या अंगावरील दागिने काढून आरोपी पसार झाला.
फिर्यादींच्या तक्रारीनुसार कवठेमहांकाळ पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.-पोलीस अधीक्षक संदीप घुगे व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तयार करण्यात आली. कवठेमहांकाळ पोलीस निरीक्षक प्रविणकुमार कांबळे यांच्या पोलीस नेतृत्वाखाली डी.बी. पथकाने तांत्रिकमाहिती व गोपनीय बातमीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कोळेकर, पोलीस संजय कांबळे, नागेश मासाळ, श्रीमंत करे, सिध्दराम कुंभार,शितल जाधव, अभिजीत कासार, अभिजीत पाटील, अजय पाटील आरोपी वाशान येथे असल्याची खात्री करून २५ नोव्हेंबर रोजी त्याला ताब्यात घेतले.
तपासात आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या अंगझडतीत फिर्यादींचे दोन सोन्याचे फुले, एक सोन्याचा शिपला आणि सोन्याचे मणी असे एकूण ४० हजार रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले. पथकाने कसून तपास करून उघडकीस आणला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रविंद्र भापकर करीत आहेत.