Navratri 2025 Katyayani: करवीर नगरीचे श्रद्धास्थान श्री कात्यायनी देवी, डोंगराच्या कुशीतील मंदिर
धार्मिक, ऐतिहासिक आणि पौराणिक वारशाने समृद्ध असलेले मंदिर
By : सागर पाटील
कळंबा : कोल्हापूर करवीरनगरीच्या दक्षिणेस, शहरापासून अवघ्या 9 किलोमीटर अंतरावर डोंगराच्या कुशीत वसलेले नवदुर्गापैकी एक असलेली वरप्राप्त देवता श्री कात्यायनी देवी मंदिर हे कोल्हापूरचे एक प्रमुख शक्तीपीठ आहे. धार्मिक, ऐतिहासिक आणि पौराणिक वारशाने समृद्ध असलेले हे मंदिर शारदीय नवरात्रोत्सवात हजारो भाविकांचे आकर्षण ठरते.
नवरात्राच्या या पवित्र काळात मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने नटलेला असतो. नैसर्गिक सौंदर्य, आध्यात्मिक शांती आणि भक्तीचा संगम येथे अनुभवायला मिळतो. पौराणिक महत्त्व आणि इतिहासाचा ठेवा ‘करवीर महात्म्य‘ ग्रंथात श्री कात्यायनी देवी मंदिराचा विशेष उल्लेख आहे. पुराणांनुसार, कोल्हासुर राक्षसाने करवीर क्षेत्रावर आक्रमण केले तेव्हा त्याच्या संरक्षणासाठी रक्तबीज राक्षस नेमला गेला.
रक्तबीजाच्या प्रत्येक रक्ताच्या थेंबातून नवीन राक्षस निर्माण होत असल्याने त्याचा नाश करणे अशक्य झाले होते. अशा वेळी देवी महालक्ष्मीने कात्यायनी स्वरूपात अवतार घेऊन भैरवाच्या सहाय्याने रक्तबीजाचा वध केला आणि करवीर क्षेत्राचे रक्षण केले. यामुळेच कात्यायनी देवीला ‘वरप्राप्त देवता‘ म्हणून संबोधले जाते.
या पौराणिक कथेमुळे मंदिराचे धार्मिक महत्त्व अधिकच अधोरेखित होते. ऐतिहासिकदृष्ट्याही या मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. छत्रपती शाहू महाराज, राजाराम महाराज यांनीही या मंदिराला भेटी दिल्या. शिकारीसाठी या परिसरात येणारे शाहू महाराज मंदिर परिसरात विश्रांतीसाठी थांबत. त्यांनी या मंदिराला राजाश्रय दिल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो.
आजही भाविक मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी जमिनीला नमस्कार करतात, ही त्यांच्या श्रद्धेची आणि निष्ठेची साक्ष आहे. आजही येथील नैसर्गिक सौंदर्य भाविकांना मोहित करते. मंदिराजवळ जयंती नदीचा उगम आहे, आणि येथील गुहेतून वाहणारे गोमुख पाण्याचा प्रवाह भक्तांना आकर्षित करतो. पूर्वी ‘उगम‘ नावाच्या झऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहायचे. नवरात्रोत्सवाची भव्यता
नवरात्रोत्सवात श्री कात्यायनी मंदिरात उत्साहाचे आणि भक्तीचे वातावरण पाहायला मिळते. बालिंगा गावचे ग्रामदैवत असलेल्या या मंदिरात नवरात्राच्या पहिल्या दिवशी देवीचे खडीसाखर आणि साळीच्या मालांनी विशेष पूजन केले जाते. दर अमावस्येला महाप्रसादाचे आयोजन होते, तर नवरात्रात सकाळपासून रात्रीपर्यंत अखंड पूजा, आरती आणि महाप्रसादाचे कार्यक्रम भाविकांचे प्रमुख आकर्षण ठरतात.
मंदिर ट्रस्टतर्फे या काळात विविध धार्मिkक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले जाते, ज्यामुळे भक्तीचा उत्साह द्विगुणित होतो. नवरात्रात येथे दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागतात. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून हजारो भाविक या शक्तीपीठाचे दर्शन घेण्यासाठी येतात. मंदिराचा अलीकडेच जीर्णोद्धार करण्यात आला असून, भाविकांसाठी पाणी, स्वच्छतागृहे यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
श्रद्धा, समर्पण आणि संस्कृतीचा संगम
श्री कात्यायनी देवी मंदिर हे केवळ पूजास्थान नाही, तर ते श्रद्धा, समर्पण आणि संस्कृतीचा संगम आहे. येथे येण्राया प्रत्येक भाविकाच्या मनात देवीची कृपा आणि भक्तीचा भाव रुजलेला असतो. नवरात्रोत्सवात या मंदिरातून मिळणारी आध्यात्मिक ऊर्जा आणि शांती प्रत्येकाला एका अविस्मरणीय यात्रेचा अनुभव देते.
नवरात्रोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून, तो शक्ती, श्रद्धा आणि सामाजिक एकतेचा संदेश देतो. श्री कात्यायनी मंदिरात या उत्सवाचे आयोजन करताना मंदिर ट्रस्ट आणि स्थानिक भाविक यांचा सहभाग महत्त्वाचा ठरतो. नवरात्रात करवीरनगरीच्या या शक्तीपीठाला भेट देऊन आध्यात्मिक अनुभव घेण्याचे आवाहन मंदिर ट्रस्टने व बालिंग उपसमिती यांनी भाविकांना केले आहे.
श्री कात्यायनी देवी मंदिराला भेट देणे म्हणजे केवळ दर्शन घेणे नव्हे, तर एका पवित्र यात्रेचा अनुभव घेणे आहे. करवीरनगरीच्या या शक्तीपीठातून मिळणारी शांती आणि समाधान प्रत्येक भाविकाच्या जीवनात आनंद आणि समृद्धी घेऊन येईल, यात शंका नाही.
धार्मिक पर्यटनाचे प्रमुख केंद्र
कोल्हापूरमधील पौराणिक वारसा लाभलेले श्री कात्यायनी मंदिर वर्षभर दर्शनासाठी खुले असते. विशेषत: नवरात्रात येथे भाविकांची प्रचंड गर्दी उसळते. कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी मंदिरासोबतच कात्यायनी मंदिर धार्मिक पर्यटनाचे प्रमुख केंद्र बनले आहे. मंदिर परिसरातील स्वच्छता, शांतता आणि नैसर्गिक सौंदर्य यामुळे येथे येण्राया प्रत्येकाला आध्यात्मिक उन्नतीचा अनुभव मिळतो.