कत्ती-ए.बी.पाटील पॅनेल आघाडीवर
15 पैकी 6 जागा काबीज, 9 जागांवर चुरस
वार्ताहर/प्रतिनिधी/हुक्केरी/संकेश्वर
हुक्केरी ग्रामीण विद्युत सहकारी संघाच्या निवडणुकीत कत्ती- ए. बी. पाटील स्वाभिमानी पॅनेलचे सहा उमेदवार विजयी झाले तर नऊ उमेदवार आघाडीवर आहेत. विजयी उमेदवारांमध्ये एस.सी. गटामध्ये श्रीमंत सन्ननाईक, एस. टी गटामध्ये बसवाणी लंकेपगोळ, ओबीसी गटामध्ये गजानन कोळ्ळी, ओबीसी अ गटामध्ये सत्याप्पा नाईक, महिला वर्ग महाबुबाबी नाईकवाडी, मंगल मुडलगी हे सहा उमेदवार विजयी झाले असून सामान्य वर्गातील 9 उमेदवारांमध्ये चुरस सुरू आहे. टप्प्याटप्प्याने विजयी होणाऱ्या उमेदवारांचा जल्लोष केला जात आहे. यामुळे वीज संघावर पुन्हा रमेश कत्ती यांचे वर्चस्व अबाधित राहणार आहे.
तब्बल सहा महिन्यांपासून हुक्केरी तालुक्यात वेगवान घडामोडी घडत असतानाच हुक्केरी ग्रामीण विद्युत सहकारी संघाची निवडणूक होऊ घातली. या निवडणुकीसाठी रविवार 28 रोजी चुरशीने मतदान झाले. दुपारी 4 वाजेपर्यंत जे मतदार मतदान केंद्राच्या समोर हजर होते त्यांनाच मतदानाचा अधिकार देण्यात आला. वेळेअभावी अनेक मतदार मतदानापासून वंचित राहिले. या निवडणुकीत तालुक्यातील मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आणखी तीन तास मतदानाची वेळ वाढवायला हवी होती, अशी मागणीही निवडणूक अधिकाऱ्यांसमोर मतदारांनी केली. पण त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे बरेच मतदार नाराज होऊन परतताना दिसले. या निवडणुकीसाठी 67.54 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी सुभाष संपगावी यांनी दिली. एकूण मतदान 60046 पैकी 41050 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळी 9 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. येथील सी. एस. तुबची शिक्षण संस्था व मसरगुप्पी क्रॉस नजीक बापूजी शिक्षण संस्था या दोन ठिकाणच्या मतदान केंद्रावर मतदारांनी मोठी गर्दी केली होती.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संकेश्वरकडून हुक्केरीकडे जाणाऱ्या प्रवाशी बसचा मार्ग बदलण्यात आला होता. यामुळे बेळगाव, चिकोडी, संकेश्वर मार्गे जाणाऱ्या प्रवाशांना बस मिळवण्यासाठी सुमारे 2 कि. मी. चे अंतर पायपीट करुन बस मिळवण्यासाठी जावे लागत होते. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. तसेच मतदान केंद्राकडे जाणाऱ्या मार्गावर दोन्ही बाजूने वाहनांची मोठी गर्दी झाली होती. अन्य खासगी वाहनधारकांना आपली वाहने बाहेर काढणे शक्य नसल्यामुळे मार्गावर वाहने थांबवण्यात आली होती. यामुळे वाहनाच्या गर्दीतून मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी मतदारांची विशेष करुन वयोवृद्ध मतदारांची अडचण होत होती.
मोहिते-कत्ती यांच्यात वादावादी
रायबागचे काँग्रेस नेते महावीर मोहिते व युवा नेते पृथ्वी कत्ती यांच्यात चांगलाच वाद निर्माण झाला होता. वीज संघाची निवडणूक ही हुक्केरी तालुक्यापुर्तीच मर्यादित असताना रायबागहून या निवडणुकीत भाग घेणे उचित नाही, यातून वाद पेटला होता. अखेर पोलिसांनी दोन्ही नेत्यांची समजूत काढताना या वादावर पडदा टाकला. दरम्यान, निवडणुकीतील प्रचार तंत्राचे धोरण व रविवारी मतदारांचा कल पाहता दि. अप्पणगौडा पाटील पॅनेलची बाजू भक्कम वाटते. तसेच जारकीहोळी गटाचे पारडे जड झाले आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण होताच रात्री 9 वाजता मतपेट्या एकत्र करून मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरूवात करण्यात आली. रात्री उशीरापर्यंत मतमोजणी सुरू होती. टप्प्याटप्प्याने निकाल घोषित करण्यात येणार आहेत.