केटी लेडेकी, लिऑन मर्चंड, जोसस्ट्रॉम सुवर्णपदक विजेते
वृत्तसंस्था /नेनटेरी (फ्रान्स)
2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत अमेरिकेची 27 वर्षीय महिला जलतरणपटू केटी लिडेकीने जलतरण प्रकारातील दीर्घ पल्ल्याच्या शर्यतीत पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिध्द केले. तिने महिलांच्या 1500 मी. फ्रीस्टाईल प्रकारात सुवर्णपदक पटकाविले. त्याच प्रमाणे पुरूषांच्या 200 मी. बटरफ्लायमध्ये फ्रान्सच्या लिऑन मर्चंडने सुवर्णपदकाला गवसणी घातली. महिलांच्या 100 मीटर फ्री स्टाईल प्रकारात स्वीडनच्या सारा जोसस्ट्रॉमने सुवर्णपदक मिळविले.
महिलांच्या 1500 मी. फ्रीस्टाईल प्रकारात अमेरिकेच्या केटी लिडेकीने 15 मिनीटे, 30.02 सेकंदाचा अवधी घेत नव्या ऑलिम्पिक विक्रमासह सुवर्णपदक पटकाविले. लिडेकीच्या वैयक्तिक जलतरण कारकिर्दीतील हे सातवे ऑलिम्पिक सुवर्णपदक आहे. यापूर्वी जलतरण क्रीडा प्रकारात ऑलिम्पिक स्पर्धेत अमेरिकेची महिला जलतरणपटू डेरा टोरेस, नाताली कुगलीन आणि जेनी थॉमसन यांनी सर्वाधिक पदके मिळविण्याचा विक्रम केला होता. आता लिडेकीने या अमेरिकन महिला जलतरणपटूंच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. महिलांच्या 1500 मी. फ्रीस्टाईल प्रकारात फ्रान्सच्या किपचिनीकोव्हाने 15 मिनीटे 40.35 सेकंदाचा अवधी घेत रौप्य पदक तर जर्मनीच्या इसाबेल गोसेने 15 मिनीटे 41.16 सेकंदाचा अवधी घेत कास्य पदक घेतले.
चीनच्या पॅन झेनेलीला सुवर्ण
पुरूषांच्या 100 मी. फ्रीस्टाईल जलतरण प्रकारात चीनचा जलतरणपटू पॅन झेनेलीने 46.40 सेकंदाचा अवधी घेत सुवर्णपदक पटकाविले. जलतरण क्रीडा प्रकारात चीनचे हे पहिले सुवर्णपदक आहे. या क्रीडा प्रकारात ऑस्ट्रेलियाच्या कायली चॅमेर्सने 47.48 सेकंदाचा अवधी घेत रौप्य पदक तर रुमानियाच्या डेव्हिड पोपोव्हीसीने 47.49 सेकंदाचा अवधी घेत कास्य पदक पटकाविले.
लिऑन मर्चंडला सुवर्ण पदक
पुरूषांच्या 200 मी. बटरफ्लाय प्रकारात फ्रान्सच्या 22 वर्षीय लिऑन मर्चंडने सुवर्णपदक पटकाविले. या क्रीडा प्रकारात मर्चंडने विद्यमान ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता तसेच विश्व विक्रमवीर क्रिस्टॉक मिलाकला मागे टाकले. मर्चंडने या क्रीडा प्रकारात 1 मिनीटे 51.71 सेकंदाचा अवधी घेत नवा ऑलिम्पिक स्पर्धा विक्रम नोंदविला. ऑलिम्पिक स्पर्धेतील मर्चंटचे हे दुसरे सुवर्ण पदक आहे. महिलांच्या 100 मी. फ्रीस्टाईल प्रकारात स्विडनची जलतरणपटू सारा जोसस्ट्रॉमने 52.16 सेकंदाचा अवधी घेत सुवर्ण पदक पटकाविले. जोसस्ट्रॉमचे ऑलिम्पिकमधील हे पाचवे सुवर्ण पदक आहे. या क्रीडा प्रकारात टोरी हुस्केने 52.29 सेकंदाचा अवधी घेत रौप्य पदक तर हॉगकाँगच्या हॉगेने 52.33 सेकंदाचा अवधी घेत कास्यपदक घेतले. 2008 च्या बिजिंग ऑलिम्पिकमध्ये जोसस्ट्रॉमने पहिल्यांदा आपला सहभाग दर्शविला होता आणि या ऑलिम्पिक स्पर्धेत अमेरिकेच्या फ्लेप्सने विक्रमी 8 सुवर्ण पदकांची कमाई केली होती. 2016 च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत जोसस्ट्रॉमने 100 मी. बटरफ्लायमध्ये सुवर्णपदक पटकाविले होते.