काश्मिरी तरुणाची अयोध्येत घुसखोरी
रामलल्लाच्या दरबारात नमाज पठणाचा प्रयत्न : राम मंदिर परिसरातील घटनेने खळबळ : अलर्ट जारी
वृत्तसंस्था/ अयोध्या
अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर परिसरात शनिवारी एका संशयास्पद घटनेमुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मंदिर परिसरातील अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या ‘दक्षिण परकोट’ भागात एका काश्मिरी तरुणाने नमाज पठण करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. रामलल्लाच्या दरबारात घडलेल्या या खळबळजनक घटनेनंतर अयोध्येत अलर्ट जारी करून अन्य संशयितांचा शोध घेण्यासाठी दिवसभर विशेष मोहीम राबविण्यात आली.
अयोध्येतील भव्य राम मंदिर परिसरात श्रीनगरहून आलेल्या एका काश्मिरी तरुणाने राम मंदिर परिसरात नमाज पठण करण्याचा प्रयत्न केला. सुरक्षारक्षकांनी त्याला अडवल्यानंतर या तरुणाने मंदिर परिसरातच घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. या प्रकारामुळे मंदिर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन तेथे तैनात असलेल्या सुरक्षा दलांनी तत्काळ हस्तक्षेप करत त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला चौकशीसाठी नेण्यात आले. अयोध्येतील ताज्या घटनेनंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीची ओळख पटली आहे. अहमद शेख असे त्याचे नाव असून तो श्रीनगरच्या सोफिया भागातील रहिवासी आहे. आता गुप्तचर यंत्रणा, स्थानिक पोलीस आणि वरिष्ठ अधिकारी संयुक्तपणे त्याची चौकशी करत आहेत. मात्र, या प्रकरणावर जिल्हा प्रशासनाने अधिकृत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. तसेच श्रीराम मंदिर ट्रस्टनेही मौन बाळगले आहे. हा तरुण काश्मीरमधून अयोध्येत नक्की कधी आणि कोणासोबत आला होता, याचा तपास आता स्थानिक पोलीस आणि एटीएस करत आहे. मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, यामागे काही नियोजित कट होता का? हे शोधण्याचे मोठे आव्हान सुरक्षा यंत्रणांसमोर आहे. या घटनेनंतर संपूर्ण अयोध्या नगरीत ‘हाय अलर्ट’ घोषित करण्यात आला आहे.
संशयित व्यक्ती पोलिसांच्या रडारवर
दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी म्हणून शहरात काश्मिरी शाल विक्रीसाठी आलेल्या काही व्यक्तींनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. या कारवाईमुळे अयोध्येत सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, यापूर्वी सुमारे दोन वर्षांपूर्वी मध्य प्रदेशातील शाजापूर जिह्यात अशीच घटना घडली होती. तेथे तीन मुस्लीम तरुणांनी राम मंदिर परिसरात प्रवेश करून नमाज पठण केले होते. मंदिराच्या पुजाऱ्यांनी विरोध करूनही ते न थांबल्याने प्रकरण चिघळले होते. अखेर पुजाऱ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
भाविकांच्या सतर्कतेमुळे तरुण सापडला जाळ्यात
ताब्यात घेण्यात आलेला हा तरुण काश्मीरचा रहिवासी असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. केवळ नमाज पठणच नव्हे, तर या तरुणाने मंदिर परिसरात विशिष्ट संप्रदायाच्या घोषणा देऊन वातावरण चिघळवण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. हा काश्मिरी तरुण दर्शनाच्या रांगेतून किंवा मंदिर परिसरातून जात असताना अचानक दक्षिण परकोट भागात थांबला. तिथे त्याने नमाज पठण सुरू करताच जवळच उभ्या असलेल्या काही भाविकांच्या हा प्रकार लक्षात आला. भाविकांनी वेळ न घालवता तेथे तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांना ओरडून बोलावले आणि या संशयास्पद कृत्याची माहिती दिली. सुरक्षा रक्षकांनी जेव्हा त्या तरुणाला रोखण्याचा आणि तिथून बाजूला नेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने प्रतिकार करण्यास सुरुवात केली. यावेळी त्याने विशिष्ट संप्रदायाशी संबंधित प्रक्षोभक घोषणाबाजी केली. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे मंदिर परिसरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांनी तातडीने परिस्थितीवर नियंत्रण मिळवत तरुणाला सुरक्षितस्थळी हलवले.
‘त्या’ कृत्यामागे मोठा कट?
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांच्या वरिष्ठ अधिक्रायांनी तातडीने अयोध्येत धाव घेतली असून, संबंधित तरुणाची एका अज्ञातस्थळी कसून चौकशी केली जात आहे. तपास यंत्रणांसमोर सध्या सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, हा तरुण अयोध्येत एकटाच आला होता की त्याच्यासोबत आणखी काही साथीदार आहेत? केवळ धार्मिक भावना दुखावण्यासाठी हे कृत्य केले गेले की यामागे काही मोठे षड्यंत्र आहे, या दिशेने तपासाची चक्रे फिरू लागली आहेत. मात्र, अयोध्येसारख्या ‘हाय-प्रोफाइल’ आणि कडेकोट बंदोबस्त असलेल्या ठिकाणी हा प्रकार घडल्याने सुरक्षा यंत्रणांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
...आता कडक तपासणीचे फर्मान
दररोज लाखो भाविक रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येत दाखल होत असताना, त्यांच्या सुरक्षेशी आणि मंदिराच्या पावित्र्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे. सुरक्षेसाठी तैनात असलेल्या विशेष दलांना नवीन मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. आता केवळ मुख्य प्रवेशद्वारावरच नाही, तर मंदिर परिसरात आणि उप-मार्गांवरही सुरक्षा रक्षकांचा खडा पहारा असणार आहे. भाविकांना दर्शनादरम्यान कोणताही अडथळा येऊ नये, याची काळजी घेत असतानाच प्रत्येक संशयास्पद व्यक्तीची कसून तपासणी केली जाणार आहे. मंदिर परिसरात गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी आणि संशयास्पद हालचाली टिपण्यासाठी अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसोबतच आता ड्रोन आणि साध्या वेशातील पोलिसांची संख्या वाढवण्यात आली आहे.