पोलीस अधीक्षकांना उच्च न्यायालयात हजर होण्याचे आदेश! बंटी-बबली प्रकरणात तपासात हलगर्जीपणाचा आरोप
11 जुलै रोजी 11 वाजता हजर राहण्याचे आदेश
सातारा प्रतिनिधी
सातारासह मुंबई व पुणे येथील लोकांची फसवणूक करुन लाखो रुपये लुटणारे कश्मीरा पवार आणि गणेश गायकवाड यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. परंतु तपासात ढिसाळ कारभार आणि सबळ पुरावे न दिल्याने दोघांना जामीन मंजूर झाला. याप्रकरणी फिलिफ भांबळ यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. त्यावर हायकोर्टाने पोलीस अधीक्षक शेख यांना हजर राहण्याचे आदेश दिले आहे.
गेल्या अनेक वर्षापासून कश्मीरा पवार (रा. जरडेश्वरनाका सातारा) ही पंतप्रधान कार्यालयात सचिव म्हणून कार्यरत आहे असे सांगत आहे. तसेच गणेश गायकवाड यानेही रॉ एजंट असल्याचे सांगितले आहे. आतापर्यंत सातारासह पुणे, मुंबई येथील लोकांना अमिष दाखवून लाखो रुपये घेवून त्यांची फसवणूक केली आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात फिलिफ भांबळ यांनी तक्रार दिली होती. तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाला. परंतु पोलिसांनी तपासात ढिसाळ कारभार करुन सबळ पुरावे सादर केले नाहीत. यामुळे दोघांना जामीन मंजूर झाला. यामुळे भांबळ यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेनुसार उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक समीर शेख यांना येत्या 11 जुलै रोजी उच्च न्यायालयात हजर होण्याचे आदेश दिले आहेत.