काशी ठरतेय आता आरोग्याची राजधानी
वाराणसीत पंतप्रधान मोदींचे उद्गार
► वृत्तसंस्था/ वाराणसी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी स्वत:चा लोकसभा मतदारसंघ वाराणसीमध्ये 44 महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे लोकार्पण आणि शुभारंभ केला आहे. यादरम्यान त्यांनी काशीवासीयांना संबोधित केले आहे. काशीवासीयांनी तिसऱ्यांदा मला आशीर्वाद दिल्यावर सेवकाच्या स्वरुपात स्वत:चे कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न करतोय. वृद्धांवर मोफत उपचार होणार ही माझी गॅरंटी होती. याचा परिणाम म्हणून आयुष्मान वय वंदना योजना सुरू करण्यात आली, ही योजना केवळ उपचारासाठी नसून सन्मानासाठी आहे. आता उपचारासाठी जमीन विकण्याची गरज नाही. उपचारासाठी कर्ज काढण्याचीही गरज नाही. तसेच काशी आता आरोग्याची राजधानी ठरत असल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.
पुढील काही महिन्यांमध्ये वाराणसीत अनेक प्रकल्प पूर्ण झाल्यावर शहराचा वेग अन् व्यापार वाढणार आहे. अशाप्रकारची सुविधा असलेल्या निवडक शहरांमध्ये वाराणसीचा समावेश असेल. वाराणसीत पायाभूत विकासाचे कार्य झाल्यावर त्याचा लाभ पूर्वांचलच्या युवांना मिळतो असे मोदींनी म्हटले आहे.
विकास, वारशासह काशीची वाटचाल
देश विकास आणि वारसा दोघांना एकत्र घेत वाटचाल करत असून याचे सर्वात मोठे मॉडेल काशीमध्ये तयार होतेय. येथे गंगेचा प्रवाह आहे आणि भारताच्या चेतनेचाही प्रवाह आहे. वाराणसीचा आत्मा या विविधतेत वसतो. काशीच्या प्रत्येक गल्लीत वेगळी संस्कृती आणि एक वेगळा रंग दिसून येत असल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.
जीआय टॅगिंग
काशी तमिळ संगमम यासारख्या आयोजनाने एकतेचे सूत्र मजबूत होत आहे. आता तर एकता मॉल देखील साकारला जातोय, ज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यांची उत्पादने असतील. मागील काही काळात काशीने स्वत:चा आर्थिक नकाशाही बदलला आहे. काशी केवळ शक्यतांची नव्हे तर संकल्प आणि सामर्थ्याची भूमी ठरतेय. उत्पादनांना जीआय टॅग मिळत आहे. हा जीआय टॅग असलेल्या बाजारपेठांना विकसित होण्याचा मार्ग सापडतो. उत्तरप्रदेश आता पूर्ण देशात जीआय टॅगिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. आमच्या कौशल्याला वेगाने आंतरराष्ट्रीय ओळख प्राप्त होतेय. आतापर्यंत वाराणसी आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये 21 हून अधिक उत्पादनांना जीआय टॅग मिळाला आहे. वाराणसीचा तबला, शहनाई, ठंडई, लाल पेढा, तिरंगा बर्फी, भिंतीवरील चित्रांसह अनेक जिल्ह्यांच्या उत्पादनांना टॅग मिळाला असल्याचे मोदींनी म्हटले आहे.
डेअरी उद्योगाला मजबूत करण्यावर जोर
पूर्वी जेथे उदरनिर्वाहाची चिंता होती, तेथे आता समृद्धीच्या दिशेने पावले टाकली जात आहेत. ही प्रगती वाराणसी, उत्तरप्रदेशासह पूर्ण देशात दिसून येतेय. भारत आता जगाचा सर्वात मोठा दुग्ध उत्पादक देश आहे. दहा वर्षांमध्ये 75 टक्के प्रगती झाली आहे. मागील 10 वर्षांमध्ये आम्ही डेअरी उद्योगाला मिशन मोडमध्ये पुढे नेत आहोत. पशुपालकांना किसान क्रेडिट कार्डची सुविधा दिली, कर्जाची मर्यादा वाढविली, अनुदानाची व्यवस्था केली, पशूधन वाचविण्यासाठी मोफत लसीकरण कार्यक्रम राबविला. दुधाचे संघटित संकलन करण्यासाठी 20 हजारांहून अधिक सहकारी समित्यांना पुनरुज्जीवित केले. यात लाखो नवे सदस्य जोडले गेले, जेणेकरून डेअरी क्षेत्राशी संबंधित लोकांना एकत्र आणत पुढे जाता येईल असा दावा मोदींनी केला आहे.
विरोधकांवर निशाणा
जे लोक सत्ता मिळविण्यासाठी खेळ खेळत राहतात, त्यांचे लक्ष्य परिवार का साथ, परिवार का विकास आहे. तर माझे लक्ष्य सबका साथ, सबका विकास असल्याचे म्हणत मोदींनी विरोधकांना लक्ष्य केले.
आरोपींच्या विरोधात कठोर कारवाई व्हावी
पंतप्रधान मोदींनी तत्पूर्वी बाबतपूर विमानतळावर पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पंतप्रधानांनी वाराणसी येथे घडलेल्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणाची माहिती घेत आरोपींच्या विरोधात कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. या क्रूर गुन्ह्यातील सर्व गुन्हेगारांची ओळख पटवत कठोरातील कठोर कारवाई व्हावी. तसेच भविष्यात अशाप्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती रोखण्यासाठी व्यापक आणि प्रभावी व्यवस्था करण्यावर मोदींनी जोर दिला आहे. वाराणसीत काही दिवसांपूर्वी 19 वर्षीय युवतीवर सामूहिक बलात्कार झाला होता. या प्रकरणी 23 जणांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तर याप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी 9 आरोपींना अटक केली असून अन्य फरार आरोपींचा शोध घेतला जातोय.