एटीएफ अंतरिम संचालक पदावरून काश पटेलांना हटविले
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या एफबीआयचे संचालक काश पटेल यांना अल्कोहोल, तंबाखू आणि शस्त्रास्त्र तसेच विस्फोटक ब्युरोच्या (एटीएफ) अंतरिम संचालक पदावरून हटविण्यात आले आहे. काश पटेल यांच्या जागी अमेरिकेचे सैन्य सचिव डॅनियल ड्रिस्काल यांना नियुक्त करण्यात आले आहे. ड्रिस्काल हे सैन्य सचिव म्हणून काम करणे जारी ठेवणार आहेत, तसेच अमेरिकेच्या न्याय विभागाची शाखा असलेल्या एफटीएफचे नेतृत्वही करणार आहेत. पटेल यांना फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस एटीएफच्या अंतरिम संचालकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. परंतु त्याच्या काही दिवसांनीच त्यांनी एफबीआय संचालकाच्या स्वरुपात देखील शपथ घेतली होती. न्याय विभागाच्या एका अधिकाऱ्याने या बदलाची पुष्टी केली आहे. पटेल यांना एटीएफ अंतरिम संचालक पदावरुन कधी हटविण्यात आले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु बुधवारी दुपारपर्यंत पटेल यांचे छायाचित्र आणि अंतरिम संचालक पदाचा उल्लेख वेबसाइटवर सूचीबद्ध होता. एटीएफच्या नेतृत्वात हे अचानक परिवर्तन झाले आहे. खर्चात कपात करण्याच्या योजनेच्या अंतर्गत न्याय विभाग एटीएफला अमेरिकन ड्रग विरोधी विभागात विलीन करावे की नाही, यावर विचारविनिमय करत असताना हे नेतृत्व बदल झाले आहे.