कसगीवाडीत कडब्याच्या गंजीला भीषण आग; अडीच हजार पेंढ्या जळून खाक;शेतकऱ्याचे नुकसान
धाराशिव / उमरगा : उमरगा तालुक्यातील कसगीवाडी येथे शेतातील कडब्याच्या गंजीला अचानक आग लागून शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. या आगीत सुमारे अडीच हजार पेंढ्या कडबा जळून खाक झाल्याची घटना घडली.
कसगीवाडी येथील शेतकरी संतोष विश्वनाथ गोरे यांच्या शेतात कडबा साठवून ठेवण्यात आला होता. या कडब्याच्या गंजीला अचानक आग लागली. काही वेळातच आगीने मोठे रूप धारण केल्याने संपूर्ण गंजीसह शेतातील कोटाही जळून खाक झाला.
कोट्यामध्ये ठेवलेले तीन जाड फाट, 20 पाईप, दोन बाज, कुऱ्हाड तसेच शेतीसाठी लागणारे अन्य साहित्य आगीत जळाले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, तोपर्यंत कडब्यासह शेती साहित्याचे मोठे नुकसान झाले होते.
या आगीत शेतकऱ्याचे हजारो रुपयांचे नुकसान झाल्याने प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.