कसबा बीड परिसरात रामलल्लाच्या अक्षता वाहून रामनामाच्या नामाचा गजर
कसबा बीड / वार्ताहर
करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द, कोगे, महे, कसबा बीड, गणेशवाडी, सावरवाडी, शिरोली दुमाला, हिरवडे दुमाला, सडोली दुमाला, सावर्डे दुमाला, गर्जन, मांडरे, चाफोडी आदी कसबा बीड पंचक्रोशीत अत्यंत भक्तीभावाने राममय वातावरणात गावातील मंदिरात अयोध्या श्रीराम प्राणप्रतिष्ठा वेळी अक्षता वाहून नामस्मरण व श्रीरामाचा जयघोष करण्यात आला.
अयोध्येमध्ये सोमवार 22 जानेवारीला राम मंदिरात रामललाच्या मूर्तीची 12. 29 मिनिटांनी प्राण प्रतिष्ठापना होणार असल्याने गेली आठवडाभर प्रत्येक गावागावात राम कलश व मंगल अक्षता यांची शोभा यात्रा काढण्यात आली होती. आज कसबा बीड परिसरात काही गावात घरावर प्रभू श्रीराम यांचे चित्र असलेले ध्वज लावण्यात आले. अनेक युवक डोक्यावर भगवी टोपी व गाडीला ध्वज लावून रामलल्लाच्या नावाने जय श्रीराम असे घोषणा देत फिरत होते.तर ज्या गावात राम मंदिर येथे अभिषेक, प्रवचन, भजन असे विविध धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. भागातील सर्व वातावरण राममय झाले होते.
दुपारी 12.29 मिनिटांनी प्रत्येक गावातील मंदिरात भजन -कीर्तनसाठी मोठ्या भाविकांची गर्दी झाली होती. यावेळी श्री प्रभू रामचंद्र यांची भक्ती गीते व आरती करण्यात आली व मंगल अक्षता मंदिरातील प्रभू श्री रामाच्या फोटोवर मंगल अक्षता वाहण्यात आल्या. त्यानंतर प्रसाद वाटून अत्यंत भक्तीभावाने राम गजर करण्यात आला.
यावेळी पाडळी खुर्द, कोगे, महे, कसबा बीड, गणेशवाडी, सावरवाडी, शिरोली दुमाला, हिरवडे दुमाला, सडोली दुमाला, सावर्डे दुमाला, गर्जन, मांडरे, चाफोडी आदी गावातील ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य, विकास सेवा व सहकारी दूध संस्थांचे पदाधिकारी, युवक, महिला व अबालवृद्ध मोठ्या संख्येने आप-आपल्या गावात उपस्थित होते.