Tramboli Yatra 2025: 'पी ढबाक'चा गजर अन् पावसाच्या सरीत 'लाईन बझार'ची त्र्यंबोली यात्रा संपन्न
यात्रेची तयारी आधी एक महीन्यांपासूनच सुरु होते
By : दीपक जाधव
कोल्हापूर : पोलीस दलाची त्र्यंबोली यात्रा मंगळवारी मोठ्या उत्साहात पार पडली. या यात्रेच्या निमित्ताने रोजच्या कामाचा ताण तणाव विसरून पोलिस कर्मचारी कुटुंबासह यात्रेसाठी एकत्र आले. यानिमित्ताने खात्यात असणारे व निवृत्त झालेले सर्वजण एकत्र आल्याने मुख्यालय परिसरात ‘गेट टुगेदर’ च अनुभवायला मिळाले.
दरवर्षी यात्रेच्या निमित्ताने आपल्या कुटुंबीयांबरोबर जुन्या सहकार्याना व जुन्या शेजाऱ्यांना भेटण्याची त्यांच्या सोबत सुखा दुखाच्या गोष्टीत रमण्याची पर्वणी त्यांना मिळत असते. कोल्हापूर शहरात होणाऱ्या आषाढातील त्र्यंबोली यात्रांमधील सर्वात मोठी ही यात्रा ही पोलीस मुख्यालय आणि लाईन बझारची असते. यात्रेची तयारी आधी एक महीन्यांपासूनच सुरु होते.
शौर्याचे प्रतीक म्हणून कोल्हापूर पोलिस दलात आणि मराठा लाईट इन्फंट्रीच्या जवानांत त्र्यंबोली देवीची श्रद्धेने पुजा केली जाते. दर वर्षी आषाढ महिन्यात यात्रेचे आयोजन केले जाते. राजाराम रायफल्स संस्थान व ब्रिटिश काळापासून ही यात्रेची परंपरा पाळली जाते.
ज्या ज्या वेळेस मराठा लाईट इन्फंट्रीचे जवान मोहिमेवर जातत, तेव्हा सोबत त्र्यंबोलीची प्रतीकात्मक मूर्ती नेतात. पोलिस मुख्यालयाच्या परिसरात असलेल्या सीमेवरील चार मंदीरात पैकी प्राचीन त्र्यंबोली मंदिरात दर वर्षी पोलिस कुटुंबीयांच्या वतीने देवीसाठी असलेल्या खोलीत जे कोणी पोलीस कुटुंबीय राहत असेल ते सर्वांच्या मदतीने तेथे विविध धार्मिक विधी करतात.
त्यानंतर सकाळी मुख्यालयातुन पालखी काढली. ही पालखी मुख्यालयात फिरुन आल्यानंतर मैदानावर पोलीस अधिक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या उपस्थितीत पालखीचे पुजन झाले. या पालखी सोहळ्यात पोलिस वाद्यवृंद हा आकर्षणाचे केद्र होते.
या पालखी सोहळ्यासाठी पोलीस मुख्यालयात राहत असलेले,राहुन गेलेले व खात्यातून निवृत्त झालेले सर्व कर्मचारी आपल्या कुटुंबीयांबरोबर एकत्र असल्याने पोलीस मुख्यालयातील पोलीस दलाची त्र्यंबोली यात्रा म्हणजे जणू गेटटुगेदर च असल्याचे वातावरण या त्र्यंबोली यात्रेत आणि मुख्यालयात होते.
पावसाच्या सरीत 'लाईन बझार'ची त्र्यंबोली यात्रा संपन्न
आषाढ महिन्यांत नदीला आलेल्या नवे पाणी त्र्यंबोली देवीला वाहण्यासाठी फुलांच्या माळांनी सजलेल्या कळशी डोक्यावर घेतलेल्या कुमारिक,सुवासिनी,पी ढबाकचा गजर आणि पावसाच्या सरी अशा उत्साही वातावरणात मंगळवारी लाईन बझार मध्ये त्र्यंबोली देवीची यात्रा संपन्न झाली.
पहाटे हिंदु समाज लाईन बझारच्या वतीने टेंबलाई टेकडी येथे देवीला अभिषेक करण्यात आला. त्यानंतर हनुमान मंदीरातुन महिला, लहान मुलींनी डोक्यावर कलश घेऊन भागात फेरी मारली. यावेळेस गुलालाची उधळण केली जात होती. पारंपरिक वाद्य पी. ढबाकच्या तालावर सर्वजण त्र्यंबोली देवीचा गजर करत होते.
पुढे पोलीस लाईन येथील त्र्यंबोली मंदीरात देवीची आरती झाल्यानंतर कुमारिका व सुहासिनी महिला डोक्यावर कळस घेऊन टेबलाई टेकडी कडे रवाना झाले. दरम्यान रात्री बारा नंतर परिसरातील तरुण मुले राजाराम बंधारा येथुन पी ढबाकच्या गजरात देवीला पाणी वाहण्यासाठी टेबलाई टेकडीवर जाऊन पाणी वाहले.