आचऱ्यातील रामेश्वर संस्थानच्या शाही गणेशोत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता; 41 दिवसांच्या उत्सवाला पूर्णविराम
जिल्ह्यात दीर्घकाळ चालणाऱ्या गणेशोत्सवांमध्ये आचरा येथील रामेश्वर संस्थानच्या उत्सवाला विशेष महत्त्व आहे. या उत्सवाच्या सांगता सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी दुपारी श्रींचे उत्तरपूजन झाल्यानंतर महालदारांनी ‘श्री गजानन महाराज’ अशी ललकारी दिली आणि विसर्जन सोहळ्याला सुरुवात झाली.
सहा तास चालली विसर्जन मिरवणूक
ढोलपथकांचा गजर आणि फटाक्यांच्या आतषबाजीत विसर्जन मिरवणूक रामेश्वर मंदिरातून निघाली. आचरा तिठा, बाजारपेठ, भंडारवाडी, काझीवाडी, गावडवाडी आणि आचरा बंदरमार्गे मिरवणूक पिरावाडी येथे दाखल झाली.
पिरावाडी येथील श्री देव चव्हाटा येथे गणेशमूर्ती काही वेळ ठेवण्यात आली. यावेळी मच्छीमार बांधवांनी श्रींचे दर्शन घेतले. त्यानंतर मिरवणूक समुद्रकिनाऱ्याकडे मार्गस्थ झाली. सुमारे सहा तास चाललेल्या या मिरवणुकीत स्थानिक भाविकांसह मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि गोवा येथील भक्त सहभागी झाले होते.
महाआरतीनंतर समुद्रात विसर्जन
पिरावाडी समुद्रकिनारी गणेशमूर्ती दाखल झाल्यानंतर श्रींची महाआरती करण्यात आली. यावेळी भाविकांना प्रसाद म्हणून मोदकांचे वाटप करण्यात आले. 41 दिवसांच्या उत्सवाची सांगता होत असल्याने भाविकांमध्ये भक्तिभावासोबतच विरहाची भावना दिसून आली. ‘मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणांनी समुद्रकिनारा भक्तिमय झाला.
सर्वधर्मीयांचा सहभाग; पोलिसांचा बंदोबस्त
विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पडावी यासाठी आचरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातविले यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मिरवणुकीत हिंदू बांधवांसोबत गावातील अन्य धर्मीय नागरिकांनीही सहभाग घेतला. धार्मिक परंपरा, ग्रामस्थांचे ऐक्य आणि उत्साह यांच्या संगमातून रामेश्वर संस्थानच्या शाही गणेशोत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता झाली.
