Kasaba Beed Rain: महे-कसबा बीड, कोगे-कुडीत्रे पुलावर पाणी, पर्यायी मार्गांचा वापर सुरु
कसबा बीड भागातील तुळशी, भोगावती, कुंभी नदीच्या पात्रात पाण्याची वाढ सुरुच
By : विश्वनाथ मोरे
कसबा बीड : कसबा बीड परिसरात संततधार पावसामुळे तसेच राधानगरी, तुळशी धरणातून येणाऱ्या पाण्यामुळे ओढे, नदी, नाले ओसंडून वाहत आहे. दोन दिवसाच्या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी वाढल्याने बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यामध्ये कसबा बीड परिसरातील कोगे-बहिरेश्वर, कोगे-कुडीत्रे या बंधाऱ्यांवर पाणी आले आहे. शिवाय महे - कसबा बीड दरम्यान असणाऱ्या पुलावर पाणी आले आहे.
त्यामुळे कोल्हापूर ते आरळे आणि कोगे-कुडीत्रेला जाणाऱ्या सर्व प्रवासी व नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून कोगे-कुडीत्रे आणि महे-कसबा बीड ग्रामपंचायतच्यावतीने सर्वांना माहिती दिली आहे. त्याचबरोबर नदीकाठच्या गावातील नागरिकांनी पुराचे पाणी वाढत असल्याने सुरस्थित ठिकाणी स्थलांतरित व्हावे असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
नद्यांच्या पाणी पातळीत वाढ
कसबा बीड भागातील तुळशी, भोगावती, कुंभी नदीच्या पात्रात पाण्याची वाढ होत आहे. संततदार पाऊस असल्यामुळे धरण क्षेत्रातून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात येत आहेत.
करवीर तालुक्यातील आरे-सावरवाडी दरम्यान असणाऱ्या पुलावर आणि तसेच बाचणी-शिरोली दरम्यान पुलावर पाणी आले आहे. या दोन्ही पुलावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी अन्य पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असे या चारही गावातल्या ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले आहे.