For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कारवार खासदारांनी घेतली अधिकाऱ्यांची बैठक

10:27 AM Jun 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
कारवार खासदारांनी घेतली अधिकाऱ्यांची बैठक
Advertisement

अधिकाऱ्यांनी तत्परतेने नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात : विकासकामांसंदर्भात,कामकाजाबाबत केल्या अधिकाऱ्यांना सूचना

Advertisement

खानापूर : कारवार लोकसभा मतदारसंघाचे खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी आपल्या निवडीनंतर पहिलाच खानापूर दौरा केला असून या दौऱ्यात त्यांनी शुक्रवार दि. 14 रोजी तालुक्यातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विकासकामांबाबतचा तसेच कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी अधिकाऱ्यांना सूचना करून सर्वसामान्य जनतेला तत्परतेने न्याय द्यावा आणि कामकाजात सुधारणा करावी, तसेच सर्व कार्यालयांतून स्वच्छता राखण्यात यावी, अशा सूचना केल्या. तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रस्तावना केली. यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर, ता. पं. कार्यनिर्वाहक अधिकारी विरनगौड एगनगौडर यांच्या हस्ते खासदार कागेरी यांचा अधिकारी वर्गाच्यावतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी तालुक्यातील सर्व खात्यांचे अधिकारी, ग्रा. पं. पीडीओ उपस्थित होते.  कागेरी यांनी अधिकाऱ्यांकडून तालुक्यातील मूलभूत पायाभूत सुविधा, रस्ते, पाणी यासह इतर समस्या आणि कामकाजाबाबत चर्चा केली. तालुक्याच्या विकासाबाबत वेळोवेळी माहिती देण्यात यावी, अशी सूचना करण्यात आली. तसेच विकासकामाबाबत तातडीने आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तालुक्यातील रस्त्याबाबत चर्चा करताना सार्वजनिक बांधकाम खात्याचे रस्ते जर सुरळीत नसतील आणि या रस्त्यामुळे जर अपघात घडला तर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या तसेच संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांवर अपघातग्रस्तानी गुन्हा दाखल करावा, अशी सूचना केली. तसेच दुर्गम भागातील विकासाबाबत वनखात्याने आडमुठे धोरण न अवलंबिता आवश्यक ठिकाणी स्थानिक पातळीवर संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून विकासकामाबाबत मार्ग काढावा, असे सांगितले.

Advertisement

शिक्षणाचा दर्जा सुधारण्याबाबत अधिकाऱ्यांनी उपाययोजना कराव्यात

तालुक्यातील शिक्षण खात्याबाबत आढावा घेताना त्यांनी शिक्षणाचा दर्जा सुधारण्याबाबत अधिकाऱ्यांनी उपाययोजना कराव्यात, शैक्षणिक क्षेत्रात कोणताही हलगर्जीपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही, सर्व सरकारी शाळेतून माध्यान्ह आहार आणि शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी अधिकाऱ्यानी प्रयत्न करावेत. तसेच वैद्यकीय सेवेबाबत सखोल चौकशी करून वैद्यकीय सेवेत कोणतीही हयगय झाल्यास कठोर पावले उचलण्यात येतील, असे सांगितले. यावेळी सर्व खातेनिहाय अधिकाऱ्यांशी हेगडे यांनी सविस्तर चर्चा केली. आणि आवश्यक त्या सूचना केल्या. या बैठकीला गटशिक्षणाधिकारी, पशू संगोपन अधिकारी, कृषी अधिकारी, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी, बस आगारप्रमुख, मत्स्यपालन खाते, बागायत खाते यासह सर्व ग्राम पंचायतीचे विकास अधिकारी उपस्थित होते. आनंद भिंगे यांनी आभार मानले.

महिला-शिशू इस्पितळ रुग्णांच्या सेवेसाठी लवकरच उपलब्ध करू

नव्याने उभारण्यात आलेल्या महिला व शिशू इस्पितळाबाबत लवकरच उद्घाटनासाठी प्रयत्न केले जातील, याबाबत सरकारकडून आवश्यक सामग्री उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले जातील, आणि लवकरात लवकर हे इस्पितळ रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगितले. तालुक्यातील वीजपुरवठ्याबाबत सुधारणा करण्यासाठी यावेळी सूचना करण्यात आली. ग्राम पंचायत अधिकाऱ्यांनी सामान्य जनतेला वेठीला न धरता त्यांची कामे योग्य वेळेत करावित, अशी सूचना केली. दळणवळण व्यवस्थेबाबत बस आगारप्रमुखांना शालेय विद्यार्थ्यांना आणि दुर्गम भागातील नागरिकांना वेळेवर बस उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ते क्रम घेण्यात यावेत, अशी सूचना केली.

Advertisement
Tags :

.