For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कारवार लोकसभा निवडणूक कुणबी समाज-वनवासीवरील अन्यायाविरोधात

10:08 AM Apr 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
कारवार लोकसभा निवडणूक कुणबी समाज वनवासीवरील अन्यायाविरोधात
Advertisement

कारवार : कारवार लोकसभा मतदारसंघातील निवडणूक काँग्रेसविरुद्ध भाजप नाही. तर ही निवडणूक जोयडा तालुक्मयातील कुणबी समाज, वनवासीवर केंद्र सरकारकडून झालेल्या अन्यायाच्या विरोधात आहे. असे प्रतिपादन काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांनी केले. त्या जोयडा तालुक्यातील कुंभारवाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेसच्या प्रचारसभेत बोलताना पुढे म्हणाल्या, गेल्या दहा वर्षापासून भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने समाजाच्या वेगवेगळ्या घटकावर  अन्याय सुरू ठेवला आहे. वर्षभर दिल्लीच्या सीमेवर आंदोलन छेडणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न एसी रूममध्ये जीवन व्यथित करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपच्या अन्य नेत्याने केला नाही. एवढ्यावर समाधान न झालेल्या भाजपवाल्यानी आंदोलन शेतकऱ्यांना दहशतवादी असा लेबल चिकटविण्याचा प्रयत्न केला. दिल्लीकडे बघा आणि मतदान करा असे आवाहन भाजपकडून केले जात आहे. वर बघून मतदान करायचे असेल तर यांनी निवडणूक कशासाठी लढवायची असा प्रश्न उपस्थित करून डॉ. निंबाळकर पुढे म्हणाल्या, संपूर्ण देशात नरेंद्र मोदी यांनाच  भाजपवाल्यानी निवडणुकीच्या आखाड्यात उतरवावे. भाजप सरकार आपल्या खात्यात 15 लाख रुपये जमा करणार म्हणून अनेकांनी रांगेत उभे राहून बँक खाते उघडले. तथापी 15 लाख रुपये नव्हे 15 पैसेही खात्यात जमा करण्यात आले नाहीत.

Advertisement

30 वर्षे जिल्हा भाजपच्या हवाली केली पुढील पाचवर्षे मतदारसंघ आपल्याकडे सोपवावा असे आवाहन करून डॉ. निंबाळकर पुढे म्हणाल्या, एकदा का मतदारसंघ आपल्या ताब्यात दिलात तर मतदारसंघाचा चेहरा निश्चितपणे बदलू तुमच्या कष्टाची दखल दिल्लीश्वराना घेण्यास भाग पाडू. भाजपचे उमेदवार शिक्षणमंत्री असताना त्यानी कितीवेळा जोयडा तालुक्याला भेट दिली आहे? विधानसभेवर सहावेळा निवडून आलेल्या विश्वेश्वर हेगडे यांनी मतदारसंघासाठी कार्य केले आहे? कुणबी समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश झाला पाहिजे. त्यासाठी दिल्लीदरबारी प्रयत्न झाले पाहिजे. काँग्रेसला मते दिल्यास निश्चितपणे जोयडा तालुक्यातील अति मागासलेल्या कुणबी समाजाला आणि वनभूमी अतिक्रमण धारकांना न्याय मिळवून दिला जाईल. संविधान हा पवित्र ग्रंथ : हल्याळ जोयडाचे आमदार आर. व्ही. देशपांडे याप्रसंगी बोलताना म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान नावाचा ग्रंथ देशाला बहाल केला आहे. याच ग्रंथाने मतदानाचा पवित्र हक्क देशवासियांना बहाल केला आहे. म्हणूनच मतदान करण्यापूर्वी सारासार विचार करा. गरिबांच्या कल्याणासाठी मतदारसंघाच्या विकासासाठी महिलांचे भले करणाऱ्या काँग्रेसला मतदान करा. भाजपवाल्यानी काही एक केलेले नाही. वर बघून मतदान करा असे सांगणारे भाजपवाले आम्हाला केवळ सूर्य, चंद्र दाखवत आहेत. राज्य किसान काँग्रेसचे प्रधान कार्यदर्शी रवी रेडकर, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष विनय देसाई, केपीसीसी सदस्य सदानंद दबगार, मंगेश कामत, चेन्नम्मा डोंबार, दत्ता मंजुनाथ मोकाशी, अरूण देसाई, दिव्या आदी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.