क्षेत्र प्रयाग येथे कार्तिक स्वामी दर्शनासाठी गर्दी...हजारो भाविकांनी दर्शनाचा घेतला लाभ
प्रयाग चिखली वार्ताहर
कार्तिकी पौर्णिमेच्या योगावर कार्तिक स्वामी दर्शनासाठी करवीर काशी क्षेत्र प्रयाग चिखली येथे 26 व 27 नोव्हेंबर या दोन दिवसात कोल्हापूर परिसर व जिल्हाभरातून आलेल्या हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.
चालू वर्षी येथील जागृत मानल्या जाणाऱ्या कार्तिक स्वामी मूर्ती दर्शनाचा योग २६ नोव्हेंबर दुपारी 3 वाजून ५३ मिनिटापासून चालू झाला. दर्शनासाठी दुपारपासून भाविकांनी क्षेत्र प्रयाग येथील संगमेश्वर कार्तिक मंदिरामध्ये भाविकांनी गर्दी केली. चालू वर्षी पुजाऱ्यांनी केलेल्या नीटनेटक्या संयोजनामुळे हजारो भाविकांनी अत्यंत शिस्तबद्धरीत्या 26 नोव्हेंबर रोजी रात्री उशिरापर्यंत तसेच 27 नोव्हेंबर रोजी पहाटेपासून दुपारपर्यंत परिसरातील 25 हजारावर भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. येथील संगमेश्वर मंदिरामध्ये सहा तोंडे तसेच बारा हात असलेली मोरावर बसलेली पूर्णाकृती कार्तिक स्वामींची मूर्ती आहे. या कार्तिक स्वामी मूर्तीला दर्भ चंदन फुले धूप दीप मयूर पुष्प अर्पण करून भाविकांनी भक्तिमय वातावरणामध्ये दर्शनाचा लाभ घेतला. विशेष करून दर्शनासाठी महिलांचा उत्साह प्रचंड दिसत होता.
दरम्यान, आज सोमवार असल्यामुळे येथील संगमेश्वर तसेच दत्त मंदिरामध्ये ही दर्शनासाठी गर्दी झाली. कार्तिक स्वामी मूर्तीला महा अभिषेक, पूजा बांधणे महाआरती इतर विधी सेवा पुजारी श्रीमती सावित्री गिरीगोसावी, अभिनव गिरीगोसावी, समाधान गिरीगोसावी यांनी पूर्ण क्षमतेने बजावली. त्यामुळे हजारो भाविकांना योग्यरीत्या दर्शन मिळाले. शेवटी आरती होऊन दर्शनाची सांगता झाली. प्रयाग चिखली येथील तुळजाभवानी फाउंडेशन च्या वतीने रविवारी सायंकाळी व सोमवारी पहाटे येथील घाटावर हजार दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला.