करुण नायर द्विशतकानजीक
सरफराज खान, जुरेल यांची अर्धशतके
वृत्तसंस्था/ कँटरबरी
इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारत अ संघातील करुण नायरने इंग्लंड लायन्सविरुद्धच्या चार दिवशीय अनधिकृत कसोटीत नाबाद शतक झळकवले तर सरफराज खान व ध्रुव जुरेल यांनी अर्धशतके नोंदवली. दिवसअखेर भारताने 90 षटकांत 3 बाद 409 धावा जमविल्या. नायर 186 तर ध्रुव जुरेल 82 धावांवर खेळत होते.
इंग्लंड लायन्सने नाणेफेक जिंकून भारत अ संघाला फलंदाजी दिली. कर्णधार अभिमन्यू ईश्वरन 8 धावा काढून बाद झाल्यानंतर यशस्वी जैस्वालही 24 धावांवर बाद झाला. करुण नायर व सरफराज खान यांनी तिसऱ्या गड्यासाठी 176 धावांची भक्कम भागीदारी करून अ संघाला सुस्थितीत नेले. सरफराज शतकासमीप आला असताना 92 धावांवर बाद झाला. ध्रुव जुरेलने नंतर नायरला चांगली साथ दिली आणि दोघांनी चौथ्या गड्यासाठी अभेद्य 177 धावांची भागीदारी केली. नायर 24 चौकार, 1 षटकारासह 186 तर जुरेल 104 चेंडूत 9 चौकार, एक षटकारसह 82 धावांवर दिवसअखेर खेळत होते.
संक्षिप्त धावफलक : भारत अ प.डाव 90 षटकांत 3 बाद 409 : जैस्वाल 24, ईश्वरन 8, करुण नायर खेळत आहे 186, सरफराज खान 92, जुरेल खेळत आहे 82, अवांतर 17. जोश हल 2-51, एडी जॅक 1-51.