Karul Ghat Road Closed: करुळ घाट बंद, गगनबावड्यात शुकशुकाट, चाकरमान्यांची गैरसोय
करुळ घाटात या कालावधीत चार ते पाच वेळा दरडी कोसळल्या
गगनबावडा : मुसळधार पावसामुळे करुळ घाटातील सनसेट पॉईंटजवळ गुरुवार 4 रोजी सकाळी दरड कोसळली. रस्त्यावरील भराव बाजूला सारून वाहतूकीस खुला करणे, आणखी कोसळण्याचा धोका आहे त्या ठिकाणी पोखरुन खाली पाडणे यासाठी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी, जिल्हा दंडाधिकारी व राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाने 12 सप्टेंबर पर्यंत करुळ घाटातील वाहतूक बंद ठेवली आहे.
आठवडाभरापासून वाहनांअभावी गगनबावडा कळे मार्गावर व गगनबावडा येथे शुकशुकाट पसरला आहे. गगनबावडा तालुक्यात सलग चार महिने मुसळधार पाऊस कोसळत आहे. येथील घाटमाथे पाणलोट क्षेत्र व येथील करुळ व भूईबावडा या दोन घाटमार्गात सर्वाधिक पाऊस पडला आहे. करुळ घाटात या कालावधीत चार ते पाच वेळा दरडी कोसळल्या.
भराव हटविण्याच्या काही काळानंतर वाहतूक पूर्ववत सुरु झाली. मात्र गुरुवार 4 रोजी म्हणजे गणेश चतुर्थीच्या दरम्यान अती मुसळधार पाऊस झाला होता. करुळ घाटातील सनसेट पॉईंटजवळ दरड कोसळली. काळ्या खडकाचा निम्मा भाग रस्त्यावर आला होता. दगड कटिंग करुन बाजूला सारणे कठिण बनले होते. धुवांधार पाऊस दाट धुके त्यामुळे दरड हटविणे कठिण बनले होते.
उर्वरित काही भाग कोसळण्याच्या अवस्थेत होता. जिल्हा प्रशासानाने अभियंता टिमद्वारे संपूर्ण घाटमार्गाची पाहणी केली. तर पाच ठिकाणी आणखी धोके निर्माण झाल्याचे दिसून आले. संभाव्य जिवीत व वित्त हानी टाळण्यासाठी 12 सप्टेंबरपर्यंत घाटातील वाहतुकीस बंदी घालण्यात आली. या घाटातील वाहतूक भूईबावडा, फोंडाघाट व अंबोली घाटातून वळविण्यात आली आहे.
करुळ घाट बंदमुळे गगनबावडा कोल्हापूर या राष्ट्रीय मार्गावर वाहनधारकांनी पाठ फिरवली आहे. वाहनाअभावी गगनबावडा येथे शुकशुकाट पसरला आहे.
चाकरमान्यांची झाली गैरसोय
सर्वात जवळचा व सुरक्षित प्रवास असल्याने कोकणवासीय मुंबईचे चाकरमानी कोल्हापूर गगनबावडा करुळ घाटातून गावी गेले. गणेशचतुर्थी आटोपून मुंबईला परण्यापूर्वीच घाटमार्ग बंद झाल्याने चाकरमान्यांना अन्य मार्गाने मुंबईस जावे लागते. त्यांची अचानक गैरसोय झाली.