Kolhapur : प्रतिपंढरपूर नंदवाळात कार्तिकी वारी सोहळा उत्साहात!
विठ्ठलनामाच्या गजरात नंदवाळात कार्तिकी वारी
वाशी : प्रतिपंढरपूर नंदवाळात कार्तिकी वारी सोहळ्यात सुमारे एक लाखाहून अधिक भाविकाने विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. विठू नामाचा जयघोष, शेकडो दिंड्यांसह दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होते.
प्रतिपंढरपूर नंदवाळ येथे प्रबोधनी एकादशी, कार्तिकी वारी सोहळा उत्साहात साजरा केला. खांद्यावर भगव्या पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, टाळ मृदंगाचा गजर करत वारकरी, भाविक रात्रीपासूनच नंदवाळकडे येत होते.
विठ्ठल रुक्मिणीची पूजा पहाटे तीन वाजता गोकुळचे संचालक एस. आर. पाटील, उमा पाटील (प्रयाग चिखली), शिरोली दुमालाचे सरपंच सचिन पाटील, पल्लवी पाटील यामान्यवरांच्या हस्ते विठ्ठल, रुक्मिणीला महाअभिषेक घालून सहपत्नीक पूजा करण्यात आली.
बेल, तुळस व पुष्पहार अर्पण करून विठ्ठल रुक्मिणीची आकर्षक पूजा बांधण्यात आली होती. काकड आरती नंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. आलेल्या वारकरी भाविकांना दिलीप जाधव, अजिंक्य पाटील, सचिन पाटील, अनिकेत केसरकर, शामराव पोवार यांच्या वतीने प्रसादाचे वाटप करण्यात आले. दरम्यान भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर समितीच्या वतीने दर्शन रांगेची सोय करण्यात आली होती.
पिरवाडी येथे दुपारी एक वाजता गोल रिंगण संपन्न झाले. यामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित केले होते. यामध्ये मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते हे रिंगण सोहळा पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती सर्व भक्तांनी रिंगण झाल्यानंतर नंदवाळकडे पालखीने प्रस्थान केले.
यावेळी ताला, सुरातील अभंगवाणी व टाळ मृदुंगाच्या निनादाने नंदवाळ परिसर मक्तीमय वातावरणात चिंब होऊन गेला होता. विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केल्याने मंदिर परिसर लख्ख प्रकाशाने उजाळून गेला होता. तसेच मंदिर आवारात छोट्या-मोठ्या दुकानांचे स्टॉल लागल्याने नंदवाळला यात्रेचे स्वरूप्त प्राप्त झाले होते.
भाविकांच्या सुरक्षेसाठी करवीर व इस्युर्ती पोलीस ठाण्याच्या वतीने करवीरचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे व पोलीस कर्मचारी होमगार्ड यांच्यावतीने बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कार्तिकी वारी सोहळ्यावेळी श्री पूजक विश्वास पाठक, सरपंच अमर कुंभार, पोलीस पाटील विनायक उलपे, भिमराव पाटील, रणजीत गुरव दत्तात्रेय वागवे, वाय डी पाटील, दीपक शिंदे यांच्यासह देवस्थान कमिटी, भाविक भक्त उपस्थित होते.