कार्तिकी एकादशी भक्तिमय वातावरणात
आजपासून तुळशी विवाह; त्रिपुरारी पौर्णिमा बुधवारी
बेळगाव : कार्तिक शुक्ल एकादशी रविवारी (दि. 2) भक्तिमय वातावरणात साजरी झाली. या एकादशीला प्रबोधिनी एकादशी असेही म्हटले आहे. एकादशी निमित्ताने शहर आणि उपनगरांतील विठ्ठल मंदिरांतून विशेष पूजा झाली. भाविकांनी दर्शनासाठी मंदिरांतून हजेरी लावली. खडेबाजार विठ्ठल मंदिर, संत नामदेव मंदिर, कार पार्किंगजवळील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, शहापूर विठ्ठल मंदिरात कार्तिकीनिमित्त सकाळपासून धार्मिक कार्यक्रम सुरू होते. खडेबाजार नामदेव मंदिरात सकाळी काकड आरती, विशेष अभिषेक, महाआरती, भजन, प्रसाद वाटप, कार पार्किंगजवळील मंदिरात पहाटे काकड आरती, सकाळी अभिषेक असे कार्यक्रम झाले.
यंदा शनिवार (ता. 1) व रविवार (दि. 2) असे दोन दिवस कार्तिक एकादशी आल्याने नेमकी कोणती एकादशी करावी, असा प्रश्न भाविकांतून निर्माण झाला होता. मात्र, शनिवारी स्मार्त संप्रदायाची एकादशी होती. भागवद् एकादशीला सुक्षेत्र पंढरपूर येथे यात्रा होत असल्याने अनेक भक्तांनी रविवारीच एकादशीचा उपवास केला. सोमवारपासून (दि. 3) तुळशी विवाहाला सुऊवात होणार आहे. सोमवार ते बुधवारी (दि. 5) त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत केव्हाही आपल्या सोयीनुसार तुळशी विवाह करता येतो. शनिवारी एकादशी केलेल्यांनी रविवारी तुळशी विवाह केला. आता सोमवारपासून तीन दिवस तुळशी विवाहाची धूम सुरू होणार आहे. येत्या बुधवारी कार्तिक पौर्णिमा (त्रिपुरारी) असून या दिवशी तुळशी विवाह व काही भागात लक्ष्मीपूजन होणार आहे.