कार्तिक काटेने अमित कुमारला ‘लपेट’ले
बेळगाव : कणबर्गी येथे जय हनुमान कुस्तीगीर संघटना आयोजित हनुमान जयंती निमित्त भव्य कुस्ती मैदानात डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटेने नवव्या मिनिटाला एकेरी लांग चढवत लपेट डावावरती अमितला आस्मान दाखवून उपस्थित 10 हजारांहून अधिक कुस्ती शौकिनांची मने जिंकली. जय हनुमान कुस्ती आखाड्यात प्रमुख कुस्ती अमितकुमार दिल्ली, गंगावेस व डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटे ही कुस्ती माजी महापौर शिवाजी सुंठकर, गुरुदेव पाटील, बसवराज येळ्ळूरकर, बाबाजी करडी, बसवराज भरमशेट्टी, डॉ. शैलेंद्र मुतगेकर आदी मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली. पहिल्याच मिनिटाला अमितकुमारने एकेरीपट काढून कार्तिक काटेला खाली घेत घिस्स्यावरती फिरविण्याचा प्रयत्न केला. पण खालुन डंकी मारुन त्यातून कार्तिकने सुटका करुन घेतली. सहाव्या मिनिटाला अमितकुमारने दुहेरीपट काढीत कार्तिकला खाली घेत सवारी भरण्याचा प्रयत्न केला. पण भरलेली सवारी तोडत खालुन डंकी मारत कार्तिकने अमितवर कब्जा मिळविला. नवव्या मिनिटाला अमितकुमारला सवारी भरण्याचे दाखवून लपेटवरती चारीमुंड्या चित करीत आपली विजय घोडदौड कायम राखली.
दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती जय हनुमान कुस्तीगीर संघटना, कणबर्गी ग्रामस्थ व युवक मंडळ यांच्या हस्ते उप कर्नाटक केसरी शिवा दड्डी व महाराष्ट्र चॅम्पियन सुमित पाटील-कराड ही कुस्ती लावण्यात आली. या कुस्तीत दुसऱ्या मिनिटाला शिवा दड्डीने सुमित पाटीलवर कब्जा मिळविला व एकचाकवरती फिरविण्याचा प्रयत्न केला. पण दोन्ही भूजा जमिनीवर न लागल्याने पंचांनी पुन्हा कुस्ती खडाखडी खेळविण्याचा निर्णाय घेतला. आठव्या मिनिटाला शिवा दड्डीने एकेरीपट काढून सुमितला खाली घेत घुटण्यावरती फिरविण्याचा प्रयत्न केला. पण त्यात तो अपयशी ठरला. पुढे डाव प्रतिडावाने झुंजली. पण वेळेअभावी कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली.
तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती कर्नाटक चॅम्पियन कामेश कंग्राळी व विश्वजित रुपनर ही कुस्ती मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली. ही कुस्ती डावप्रतिडावाने झुंजली. विश्वजित रुपनरने अनेकवेळा कामेशला खाली घेवून चीत करण्याचा प्रयत्न केला. पण 126 किलो वजनाचा कामेशला चित करणे कठीण गेले. शेवटी कुस्ती बरोबरीत राहिली. चौथ्या क्रमांकाच्या कुस्तीत राष्ट्रीय चॅम्पियन अनुप दिल्लीला निकाल डावावरती प्रेक्षणीय विजय मिळविला. पाचव्या क्रमांकाच्या कुस्तीत विक्रम शिनोळीने आदित्य पाटील-सांगलीला बॅकथ्रो डावावरती चित केले. सहाव्या क्रमांकाच्या कुस्तीत कंग्राळीचा उगवता मल्ल प्रथमेश हट्टीकरने संजू इंगळगीला घिस्यावर पराभव केला. सातव्या क्रमांकाची कुस्ती ओमकार राशिवडे व निखिल कंग्राळी ही कुस्ती जवळपास 30 मिनिटे झुंजली. वेळेअभावी बरोबरीत राहिली.
आठव्या क्रमांकाच्या कुस्ती राज पवार-सांगलीने आप्पासाहेब इंगळगीचा घुटण्यावरती पराभव केला. नवव्या क्रमांकाच्या कुस्तीत कार्तिक इंगळगीने पृथ्वीराज पाटील-कंग्राळीचा घिस्यावरती विजय मिळविला. दहाव्या क्रमांकाच्या कुस्तीत विनायक येळ्ळूरने हणमंत गंदिगवाड-भांदुर गल्लीचा झोळी डावावरती विजय मिळविला. त्याच प्रमाणे पंकज चापगाव घिस्यावर, राजू डागेकर एकचाकवर, ओमकार कोल्हापूरने ढाकेवर, गुरु दड्डीने घिस्यावर, ओमकार राशिवडेने गुणावर, प्रवीण निलजीने घुटण्यावर, सिद्धांत तीर्थकुंडयेने घिस्यावरती पराभव केला. इतर कुस्त्यांमध्ये भूमीपुत्र मुतगा, शंकर तीर्थकुंडये, राहुल-किणये, ऋषी पाटील-राशिवडे, तुकाराम किणये, महांतेश संतीबस्तवाड, मंथन सांबरा, प्रज्वल मच्छे, वेदांत मासेकर-शहापूर, संभाजी काकती, आकाश पुजारी यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करुन विजय मिळविले. आखाड्याचे पंच म्हणून गणपत बन्नोसी, बाळाराम पाटील, जोतिबा भातकांडे, भाऊ पाटील, गोपाळ पाटील, सागर सादळे, दुंडेश संतीबस्तवाड, ठेकेदार सुतार, राजू कडोली, सतीश बन्नोसी, शिवाजी पाटील-कडोली, दुद्दाप्पा कलखांबकर आदींनी काम पाहिले. कुस्तीचे समालोचन कृष्णकांत चौगुले-राशिवडे यांनी कुस्तीच्या शैलीत केले. तर कोडोली-वारणाच्या उत्तम कांबळे यांच्या रणालगीवर सर्व कुस्ती शौकिनांना खिळवून ठेवले.
पार्थ पाटील प्रेक्षणिय विजय, महेश बिर्जे मेंढ्याचा मानकरी
आकर्षक कुस्ती पार्थ पाटील-कंग्राळी व संजय चौगुले-पुणे ही कुस्ती लावण्यात आली. या कुस्तीत पहिल्या मिनिटाला संजय चौगुलेने एकेरीपट काढून पार्थवर कब्जा मिळविला. पण खालुन डंकी मारुन पार्थने संजयवर कब्जा मिळवीत निकाली डावावरती प्रेक्षणीय विजय मिळविला. मेंढ्याच्या कुस्तीत महेश बिर्जे-तीर्थकुंडये व प्रवीणकुमार -कोल्हापूर ही कुस्ती बसवंत गुणरेड्डी यांच्या हस्ते लावण्यात आली. या कुस्तीत महेशने ढाक डावावरती प्रवीणवर मात करीत मेंढ्याचे बक्षीस पटकाविले.