शहरात कार्तिक एकादशी भक्तिभावाने साजरी
विठ्ठल मंदिरातून टाळ-मृदंगाचा गजर : काकड आरती, जागर भजन, कीर्तन सोहळा रंगला : सकाळपासूनच दर्शनासाठी भक्तांची वर्दळ
बेळगाव : शहर परिसरात मंगळवारी कार्तिक एकादशी भक्तिभावाने उत्साहात साजरी झाली. यानिमित्ताने विठ्ठल मंदिरातून टाळ-मृदंगाचा गजर झाला. त्याचबरोबर काकड आरती, अभिषेक, पूजा, भजन, जागर भजन आणि कीर्तन सोहळा रंगला. शहरातील महाद्वार रोड येथील ज्ञानेश्वरी माऊली विठ्ठल-रखुमाई मंदिर, खडेबाजार नामदेव देवकी विठ्ठल मंदिर, बापट गल्ली विठ्ठल मंदिर, शहापूर विठ्ठल मंदिर आदी मंदिरातून एकादशीनिमित्त विविध कार्यक्रम झाले. त्याचबरोबर फळा, फुलांनी मूर्तींवर आरास करण्यात आली होती. सकाळपासूनच दर्शनासाठी भक्तांची वर्दळ वाढली होती. तर काही ठिकाणी पारंपरिक पद्धतीने दिंडी काढण्यात आली.
कार पाविर्ढिंग, बापट गल्ली विठ्ठल-रखुमाई मंदिर
कार पार्किंग बापट गल्ली येथील विठ्ठल-रखुमाई मंदिर सेवासंघ व सांप्रदायिक भजनी मंडळ यांच्यातर्फे कार्तिक एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने पहाटे अभिषेक झाला. हिंडलगा ग्राम पंचायतीच्या सदस्या डी. बी. पाटील, सागर पवार या दांपत्यांच्या हस्ते अभिषेक झाला. यावेळी त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी श्रीकांत सांबरेकर, प्रभाकर कणबर्गी, पांडूरंग पाटील, उदय पाटील, महादेव चौगुले, राजू पवार यांच्यासह काकड आरती महिला मंडळाच्या प्रभावती सांबरेकर, मिलन गवाणे, लता पाटील, मृणाल पाटील, दीपा पोटे यांच्यासह वारकरी भक्त आणि पदाधिकारी उपस्थित होते. भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.