कार्तिक बुडिगिना, अली इमाम अंतिम फेरीत
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा : श्रीहरी नटराज बॅकस्ट्रोकमध्ये उपांत्य फेरीत
वृत्तसंस्था, ग्लास्गो (स्कॉटलंड)
येथे सुरू झालेल्या 2026 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचे पॅरा जलतरणपटू कार्तिक बुडिगीना आणि अली इमाम यांनी पुरूषांच्या 100 मी. फ्रिस्टाईल एस-13 प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. तर भारताचा ऑलिम्पिक जलतरणपटू श्रीहरी नटराजने पुरूषांच्या 50 मी. बॅकस्ट्रोकमध्ये उपांत्य फेरी गाठली आहे.
पुरूषांच्या 100 मी. फ्रिस्टाईल एस-13 विभागातील हिटमध्ये 18 वर्षीय बुडिगिनाने 57.10 सेकंदाचा अवधी घेत अंतिम फेरीत प्रवेश मिळविताना तिसरे स्थान पटकाविले. बुडिगिनाने पहिल्यांदाच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आपला सहभाग दर्शविला आहे. या क्रीडा प्रकारात ब्रिटनचा स्टिफेन क्लेग 56.57 सेकंदासह पहिल्या स्थानावर आहे.
तसेच पुरूषांच्या 100 मी. फ्रिस्टाईल एस-12 विभागात पहिल्यांदाच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या भारताच्या अली इमामने 1 मिनिट, 05.32 सेकंदाचा अवधी घेत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. पुरूषांच्या 50 मी. बॅकस्ट्रोकमध्ये भारताच्या श्रीहरी नटराजने 25.52 सेकंदाचा अवधी घेत उपांत्य फेरीसाठी आपली पात्रता सिद्ध केली. आठ स्पर्धकांच्या या क्रीडा प्रकारात हिटमध्ये श्रीहरी नटराज पाचव्या स्थानावर राहिला.