कार्ती चिदंबरम यांची पुन्हा ईडीकडून चौकशी
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तब्बल 20 वेळा ‘हजेरी’
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कथित चिनी व्हिसा प्रकरणात काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम शनिवारी पुन्हा एकदा ईडीसमोर हजर झाले. ईडी अधिकाऱ्यांकडून आपली चौकशी करण्याची ही विसावी वेळ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी त्यांना ईडी आपल्याला फारच ‘मिस’ करत (आठवण काढत) असल्याचे वक्तव्यही त्यांनी केले. सीबीआयने हे प्रकरण बंद केले असले तरी ईडी हे प्रकरण पुन्हा उघडून आपली चौकशी करू इच्छित आहे. माझ्या वकिलाने या प्रकरणी 100 पानी उत्तर दाखल केल्याचेही त्यांनी सांगितले. कार्ती चिदंबरम यांच्यावर पंजाबमधील वीज प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी 263 चिनी नागरिकांना बेकायदेशीरपणे व्हिसा देण्यासाठी 50 लाख ऊपये घेतल्याचा आरोप आहे. अलीकडेच ईडीने सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरची दखल घेत मनी लॉन्ड्रिंगच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.