For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर

06:52 AM Jan 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर
Advertisement

मोदी सरकारची मोठी घोषणा : बिहारच्या जननायकाचा होणार सर्वोच्च गौरव

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

बिहारचे माजी मुख्यमंत्री दिवंगत कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. यासंबंधी राष्ट्रपती भवनाकडून वक्तव्य जारी करत माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे कर्पूरी ठाकूर यांची बुधवारी 100 वी जयंती साजरी करण्यात येणार असून त्यापूर्वीच त्यांना हा देशातील सर्वोच्च पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न जाहीर झाल्यावर बिहारमधील सत्तारुढ संयुक्त जनता दलाने मोदी सरकारचे आभार मानले आहेत.

Advertisement

आम्हाला 36 वर्षांच्या तपस्येचे फळ मिळाले आहे. मी स्वत:चे कुटुंब आणि बिहारच्या 15 कोटी लोकांच्या वतीने केंद्र सरकारचे आभार मानतो असे उद्गार कर्पूरी ठाकूर यांचे पुत्र रामनाथ ठाकूर यांनी काढले आहेत. कर्पूरी ठाकूर यांना त्यांच्या लोकप्रियतेमुळे जननायक म्हटले जाते. कर्पूरी ठाकूर यांना समाजातील वंचितांच्या कल्याणासाठी केलेल्या त्यांच्या अथक प्रयत्नांसाठी ओळखले जाते. भ्रष्टाचारविरोधी नेते म्हणूनही ते प्रसिद्ध होते. त्यांच्या बिहारमधील शासनकाळात लागू करण्यात आलेली भूमी सुधारणा योजना आणि शिक्षण सुधारणा योजनांचा देशभरात व्यापक प्रभाव पडला होता.

कर्पूरी ठाकूर यांचा जन्म समस्तीपूर जिल्ह्dयातील पितौझिया गावात झाला होता. पाटण्यातून 1940 मध्ये त्यांनी मॅट्रिक परीक्षा पास करत स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता. कर्पूरी ठाकूर यांनी आचार्य नरेंद्र देव यांचे अनुयायी होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर समाजवादाचा मार्ग निवडत 1942 मध्ये महात्मा गांधी यांच्या  असहकार  आंदोलनात त्यांनी भाग घेतला, यामुळे त्यांना तुरुंगातही जावे लागले होते.

1945 मध्ये तुरुंगातून बाहेर पडल्यावर कर्पूरी ठाकूर हे समाजवादी आंदोलनाचे चेहरे ठरले होते. कर्पूरी ठाकूर हे 1952 मध्ये ताजपूर विधानसभा मतदारसंघातून सोशलिस्ट पार्टीचे उमेदवार म्हणून निवडून आले होते. 1967 मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वात संयुक्त सोशलिस्ट पार्टी मोठी शक्ती म्हणून उदयास आली होती. यामुळे बिहारमध्ये पहिल्यांदा बिगरकाँग्रेस सरकार स्थापन झाले होते.

तेव्हा महामाया प्रसाद सिन्हा हे मुख्यमंत्री तर कर्पूरी ठाकूर हे उपमुख्यमंत्री झाले होते. शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांचे शुल्क रद्द करण्याचा आणि इंग्रजी अनिवार्यता संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला होता. काही काळानंतर बिहारमधील राजकारणाला नवे वळण मिळाले आणि कर्पूरी ठाकूर हे मुख्यमंत्री झाले. त्यांनी शेतकऱ्यांकरता अनेक निर्णय घेतले होते. यामुळे कर्पूरी ठाकूर हे बिहारच्या राजकारणात समाजवादाचा मोठा चेहरा ठरले होते. मंडल आंदोलनापूर्वी मुख्यमंत्री  असताना मागासांना त्यांनी 27 टक्के आरक्षण दिले होते.

कर्पूरी ठाकूर यांचे निर्णय ठरले मार्गदर्शक

-देशात पहिल्यांदाच ओबीसी आरक्षण देण्याचा निर्णय घेतला

-1977 मध्ये मुख्यमंत्री असताना मुंगेरीलाल आयोग लागू केला

-या आयोगाच्या शिफारसींवर मागासांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण प्राप्त

-मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण मोफत करण्याचा निर्णय घेणारे पहिले मुख्यमंत्री

-चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांकरता असलेली लिफ्टच्या वापरावरील बंदी हटविली

-आर्थिक दृष्ट्या दुर्बल उच्चवर्णीय आणि महिलांना आरक्षण दिले

भारतरत्न मिळविणारे बिहारचे तिसरे व्यक्ती

कर्पूरी ठाकूर यांना वंचितांसाठी लढणारे नेते म्हणून ओळखले जायचे. सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळविणारे ते बिहारचे तिसरे व्यक्ती ठरणार आहेत. त्यांच्यापूर्वी देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद आणि लोकनायक जयप्रकाश नारायण यांना हा पुरस्कार मिळाला आहे.

भारत सरकारने सामाजिक न्यायाचे प्रतीक महान जननायक कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्नने सन्मानित करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी आनंदी आहे. आम्ही त्यांची जन्मशताब्दी साजरी करत असताना हा निर्णय घेण्यात आला आहे. दलितांच्या कल्याणासाठी त्यांची अतूट प्रतिबद्धता आणि त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने भारताच्या सामाजिक-राजकीय स्थितीवर अमीट छाप सोडली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी

Advertisement
Tags :

.