Karnataki Bendur 2025: 120 वर्षानंतरही कर्नाटकी बेंदूर, इचलकरंजीतील कर तोडणीची परंपरा काय?
संस्थानाच्या हद्दीत कर्नाटकातील अनेक गावांचाही समावेश होता.
By : संजय खूळ
इचलकरंजी :
इचलकरंजीचे संस्थानिक श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे सरकार यांना शेती आणि जनावरे याबाबत प्रचंड आवड होती. संस्थानाच्या हद्दीत कर्नाटकातील अनेक गावांचाही समावेश होता. सन 1905 मध्ये नारायणराव बाबासाहेब घोरपडे हे कर्नाटकातील मायाक्का चिंचणी या ठिकाणी गेले होते.
त्यावेळी त्या ठिकाणी त्यांनी बेंदूर हा सण पाहिला आणि त्यांनी इचलकरंजीमध्येही त्या वर्षापासून बेंदूर उत्सव सुरू केला. त्यामुळेच आजही इचलकरंजीमध्ये कर्नाटकी बेंदूर सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. तब्बल 120 वर्षानंतर आजही परंपरा जोपासली जाते.
संस्थानकाळात जेमतेम सात हजार लोकवस्तीच्या या गावांमध्ये अलिशान असा राजवाडा उभा होता. या राजवाड्यात जनावरांचे प्रदर्शन भरत असे. कृष्णाकाठचे खरसुंडी, माणदेशी मुडळगी, औंध संस्थानातील वारी, करगणी, जवारी, हनम असे बैल या ठिकाणी येत असत.
याचबरोबर खेड्यापाड्यातील अनेक बैलांचा यामध्ये सहभाग होता. बेंदरादिवशी इचलकरंजीचे संस्थानिक नारायणराव बाबासाहेब घोरपडे हे लवाजम्यासह महादेव मंदिर जवळील जुन्या चावडीजवळ येत असत आणि त्या ठिकाणी बक्षीस देण्याचा व कर तोडण्याचा कार्यक्रम होत असे. घोरपडे सरकार यांचे 1943 मध्ये निधन झाल्यानंतर ही परंपरा खंडित झाली होती.
1952 मध्ये इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाची स्थापना झाली. विशेष करून यामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग होता. बेंदूर कमिटीचे पहिले अध्यक्ष म्हणून बंडू शांताप्पा मगदूम यांची निवड झाली. त्यानंतर कल्लाप्पाण्णा आवाडे, प्रकाश आवाडे, गणपतराव जेंग व सध्या बाळासाहेब कलागते या मंडळाचे अध्यक्ष आहेत. बेंदराच्या वेळी इचलकरंजीत होड्याच्या आणि लाकूड ओढण्याच्या शर्यती हा अत्यंत लोकप्रिय खेळ असे. कमीत कमी वेळेत लाकूड ओढणारा बैल ही शर्यत जिंकतो.
मध्यंतरी काही वर्षे या कार्यक्रमात बकऱ्यांच्या टकरी, घोड्यांची शर्यत, कोंबड्यांची झुंज या स्पर्धा होत होत्या. शिवाय दांडपट्टा हा मर्दानी खेळ आणि पोवाड्यांचा कार्यक्रम असायचा. पण पुढे यापैकी फक्त लाकूड ओढायच्या शर्यती कायम राहिल्या. जहागीरदारांच्या वेळचे शिसवी लाकूड अजूनही शर्यतीसाठी वापरले जाते. या लाकडाचे वजन 380-400 किलो आहे.
मध्यंतरी हे वजन कमी झाले म्हणून त्यात शिसे भरून घेतले आहे. लाकूड ओढण्याची शर्यत यापूर्वी राजाराम मैदानावर होत असे. पंचक्रोशीतील हजारो नागरिक ही शर्यत पाहण्यासाठी येत असल्याने राजाराम मैदान भरून जात असे. यासाठी 105 मीटरचे अंतर निश्चित करण्यात आले होते. बैल हे 400 किलोचे लाकूड 105 मीटरपर्यंत ओढत जाणे व पुन्हा परत येणे अशी शर्यतीची पद्धत होती.
कालांतराने राजाराम मैदानावरील ही जागा क्रिकेट खेळासाठी आरक्षित ठेवण्यात आली. त्यामुळे या स्पर्धा कागवाडे मळ्यातील जिम्नॅशियम मैदानावर होऊ लागल्या. मैदानाचे अंतर लहान असल्यामुळे 105 ऐवजी 100 मीटर अंतर ठेवण्यात आले. आजही तितक्याच उत्साहाने या स्पर्धा होत आहेत.
बेंदरासाठी चार आणे लोकवर्गणी
बेंदूर कमिटीतर्फे या सहकाऱ्यांबरोबर गावात कल्लाप्पाण्णा आवाडे वर्गणी मागत हिंडत असत. गावभागापासून माळभागापर्यंत सगळीकडे फिरून मिळेल ती वर्गणी घेऊन बेंदूर समितीचे काम चालत असे. चार आण्यापासून लोक वर्गणी देत असत.
दोन रुपये म्हणजे डोक्यावरून पाणी गेले. गुजरी पेठेतील कापड व्यापारी बक्षीसासाठी उपरणे, शेला, फेटा, धोतरजोडी, कापड-चोपड, इत्यादी रूपाने वर्गणी देत असत. एखादा उदार सराफ चांदीचा बिल्लाही देत असे. दोनअडीचशे रुपये वर्गणीमध्ये बेंदराचा सण दणक्यात साजरा व्हायचा.
कारण पूर्वी 50, 40, 25 रुपये एवढ्या माफक बक्षीसावर शेतकरी खुश असायचे. पुढे-पुढे गावातील सहकारी संस्थाही वर्गणी देऊ लागल्या. त्यामुळे बेंदराच्या सणाचा थाट वाढला. या बेंदराचे स्वरूप भव्य झाले. बक्षीसाची रक्कमही 2000, 3000 व 5000 रुपये अशी वाढत गेली.
कर तोडणीचा आज कार्यक्रम, बक्षीस वितरण
कर्नाटक बेंदूर निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. या शर्यतींचा बक्षीस वितरण सोहळा आणि कर तोडण्याचा कार्यक्रम गुरुवार 12 जून रोजी गावभागातील जुनी चावडी, महादेव मंदिर चौक येथे होणार आहे. सहकार महर्षी कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, शिवांशिष पाटील, देवाशिष पाटील आणि भाजपा जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण होणार आहे.