For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

कर्नाटकाच्या पर्यावरणविघातक नदीजोड

06:30 AM Oct 16, 2026 IST | Tarun Bharat Portal
कर्नाटकाच्या पर्यावरणविघातक नदीजोड
Advertisement

कर्नाटक सरकारने आपल्या राज्यातील पेयजल आणि जलसिंचनाचे दुर्भिक्ष भासणाऱ्या प्रदेशात पाणी नेण्यासाठी नदीजोड योजना हाती घेतलेल्या आहेत. पर्यावरण विघातक अशा योजनांमुळे राज्यासमोर आऽ वासून असणारी पाण्याची समस्या सुटण्याऐवजी आगामी काळात पर्यावरणाचे प्रश्न बिकट होण्याची शक्यता बळावत चालली आहे. अशा प्रकल्पांपैकी सध्या कर्नाटकाचा प्रस्तावित बेड्ती-वरदा आणि अघनाशिनी-वरदा नदीजोड प्रकल्प कळीचा मुद्दा बनलेला आहे.

Advertisement

राष्ट्रीय जल विकास संस्थेने पश्चिम घाटातील पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्यांचे पाणी पूर्वेकडे वळविण्यासाठी बेड्ती-धर्मा-वरदा आणि अघनाशिनी-वरदा हे दोन पर्यावरणीय दृष्टीने संवेदनशील असणारे प्रस्ताव मांडलेले आहेत. या प्रकल्पांद्वारे तुंगभद्रेची उपनदी असलेल्या ‘वरदा’ नदीत पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. बेड्ती नदीच्या खोऱ्यातून 242 दशलक्ष घनमीटर पाणी रायचूर जिह्यातील 60,200 हेक्टर क्षेत्राच्या सिंचनासाठी वळविण्याचा प्रस्ताव कर्नाटक सरकारने तयार केलेला आहे. यासाठी त्यांनी पट्टणदहल्ला आणि शालमलाहल्ला या उपनद्यांवर दोन बंधारे बांधण्याचे नियोजन केलेले आहे. खरेतर या प्रकल्पांमुळे होणाऱ्या पर्यावरणीय आणि परिसंस्थेवरील परिणामांकडे कर्नाटक सरकारने कानाडोळा करण्याचेच धोरण आरंभलेले आहे.

या प्रकल्पांसाठी बऱ्याच प्रमाणात जमीन बुडीत आणि वनसंपत्तीचा ऱ्हास होणार आहे. उत्तर कन्नड जिह्यातील सुमारे 1,005 हेक्टर जमीन पाण्याखाली जाणार असून, त्यापैकी 787 हेक्टर वनजमीन असून 130 हेक्टर शेतजमीन तर 88 हेक्टर बिगरशेती जमीन समाविष्ट आहे. यामुळे 2012 मध्ये घोषित झालेल्या बेड्ती संवर्धन राखीव क्षेत्र आणि शालमला नदी खोऱ्याच्या संवर्धन क्षेत्राला थेट धोका निर्माण झालेला आहे. त्याचप्रमाणे या प्रकल्पांचा जलचक्रावर आणि मान्सूनवर आघात होण्याची शक्यता निर्माण झालेली असून, या क्षेत्रातील संशोधकांनी त्यासंदर्भात गंभीर चिंता व्यक्त केलेली आहे.

Advertisement

पश्चिम घाटातील सदाहरित जंगले बाष्पीभवनाद्वारे पाऊस पाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात, याचेच विस्मरण अशा प्रकल्पांचे नियोजन करणाऱ्यांना होत आहे. मोठ्या प्रमाणावर जंगलतोड झाल्याने पर्जन्यचक्र बिघडेल आणि हवामान बदलाचा धोका वाढेल, याचेच विस्मरण होत आहे. गोड्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह थांबल्यामुळे समुद्राचे खारे पाणी जमिनीवरील भूजलात शिरेल आणि त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होईल व खाडीतील जैवविविधतेचा नाश होईल.

पश्चिम घाटातील जमिनीच्या वापरामध्ये बदल केल्याने भूस्खलनासारख्या आपत्तीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तुंगभद्रा प्रकल्पाच्या ज्या भागात हे पाणी नेले जाणार आहे, तिथे आधीच भूजल पातळी जमिनीपासून 1.5 मीटरपेक्षा कमी अंतरावर असून मातीत क्षारतेची तीव्र समस्या यापूर्वीच निर्माण झालेली आहे. या परिसरात अतिरिक्त पाणी नेल्यास ही सुपीक जमीन दलदलयुक्त आणि नापीक बनण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे तुंगभद्रा जलाशयात आधीच मोठ्या प्रमाणावर गाळ साचलेला असल्याने एवढा अतिरिक्त पाणीसाठा सामावून घेणे तांत्रिकदृष्ट्या व्यवहार्य होणार नाही.

संरक्षित वनांच्या सीमेपासून एक कि.मी. अंतरापर्यंत पर्यावरण-संवेदनशील क्षेत्रात (िंएZ) कोणतीही कायमस्वरुपी बांधकामे न करण्याचा सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच स्पष्ट आदेश दिलेला आहे. त्याचप्रमाणे या प्रकल्पाविरोधात स्थानिक रहिवासी, ग्रामपंचायती आणि तालुका पंचायतींनी अधिकृत ठराव मंजूर करून या नदीजोड प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे परंतु असे असताना कर्नाटक सरकार पर्यावरणाला धोका पोहोचविणारे नदीजोड प्रकल्प पुढे रेटण्याचा सातत्याने आततायीपणा करीत आहे. कर्नाटक सरकारने बेळगाव जिह्यातल्या खानापूर तालुक्यात कळसा, हलतरा, सुर्ला आणि भांडुरा नाल्यांतून 3.9 टीएमसी पाणी वळवून नेण्यासाठी लवादाद्वारे अपेक्षित निकाल मिळविण्यात यश मिळवलेले असले तरी पर्यावरणीयदृष्टीने ‘ना हरकत दाखले’ न मिळवता पावसाळी पाणी मलप्रभेच्या पात्रात वळविलेले आहे. त्याविरोधात गोवा सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे परंतु असे असताना मार्कंडेय नदीवरती कर्नाटक सरकारने धरण उभारून बेळगाव शहराला पेयजलाचा पुरवठा करण्यासाठी राकसकोप जलाशयाची निर्मिती केलेली आहे. सध्या या जलाशयाला पाण्याच्या भासणाऱ्या तुटवड्याची समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र-कर्नाटकाने तिळारी खोऱ्याकडे येणारे कोलीग येथील हलतरा नाल्याचे पाणी मार्कंडेय नदीत वळवून नेण्याची योजना परस्पर गोव्याला कल्पना न देता आखलेली आहे.

कर्नाटक सरकार आजच्या घडीस म्हादई खोऱ्यातील कळसा-भांडुरा नाल्यांना कृष्णा खोऱ्यातील मलप्रभेत तर कोलीग येथील तिळारी खोऱ्यातील हलतरा नाल्याला कृष्णा खोऱ्यातील मार्कंडेयात वळविण्याच्या प्रस्तावांचा पाठपुरावा करत आहे. कर्नाटकाचे हे नदीजोड प्रकल्प पश्चिम घाटातील केवळ सदाहरित जंगलक्षेत्रांच्या अस्तित्वाला सुऊंग लावणार नाही तर पर्यावरणाचे असंख्य प्रश्न निर्माण करणार आहे. त्यामुळे स्थानिक लोकांची शेती, बागायती त्याचप्रमाणे पारंपरिक उद्योग-व्यवसायांवरती, वन्यजीव-मानव यांच्यातला संघर्ष विकोपाला जाऊन संकटांची मालिका सुरू होणार आहे. या परिसरातल्या जंगलात आढळणाऱ्या प्रदेशनिष्ठ आणि संकटग्रस्त वन्यजीव व वनस्पतींच्या प्रजातींवर नष्ट होण्याची परिस्थिती उद्भवणार आहे.

डॉ. माधव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या पर्यावरणीय तज्ञ समितीने पश्चिम घाटाच्या सद्य आणि भविष्यकालीन परिस्थितीचा विचार करून, अशा पर्यावरण, वन्य संपदा आणि पर्यावरणीय परिसंस्थेची हानी करणाऱ्या नदीजोड त्याचप्रमाणे जलविद्युत निर्मितीच्या प्रकल्पांना परवानगी देऊ नये, असे सूचविलेले आहे.

कधीकाळी भारतीय लोकमानसाने गावोगावी पारंपरिक मार्गाने जलसंवर्धन, पर्जन्य जलसंकलन आणि विनियोग करण्यासाठी पर्यावरणाचे भान राखून तंत्राची शिफारस केलेली आहे परंतु आज हा वारसा, हेतुपुरस्सर विसरून आम्ही केवळ जंगल आणि पर्यावरणाला हानी पोहोचवून सिमेंट काँक्रीटच्या धरण आणि पाटबंधाऱ्यांच्या प्रकल्पांचा पाठपुरावा करीत आहोत. त्यामुळे पेयजल आणि जलसिंचनाच्या समस्यांची उकल होण्याऐsवजी आपण मृगजळामागे धावत धावत आपल्याच पायांवरती कुऱ्हाडीचे घाव घालणार आहोत.

राजेंद्र पां. केरकर

Advertisement
Tags :

.