For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गॅरंटी योजना राबवून कर्नाटक देशात अव्वल

10:11 AM Mar 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
गॅरंटी योजना राबवून कर्नाटक देशात अव्वल
Advertisement

जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे प्रतिपादन : मुक्तीमठात कर्नाटक सरकार गॅरंटी योजना अंमलबजावणी मेळाव्याचे उद्घाटन

Advertisement

बेळगाव : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी पाच गॅरंटी योजना राज्यामध्ये समर्पकपणे राबवून कर्नाटक देशात आदर्श राज्य ठरले आहे. या योजनांची जनजागृती करण्यासाठी राज्यभर मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत आहे. निवडणुकीमध्ये दिलेले आश्वासन पाळण्यात आले आहे, असे प्रतिपादन जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले. बेळगाव आणि हुक्केरी तालुका पंचायत प्रशासनासह ग्रामीण स्थानिक संघ-संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भुतरामहट्टी येथील मुक्तीमठात कर्नाटक सरकार गॅरंटी योजना अंमलबजावणी मेळाव्याचे उद्घाटन करून ते बोलत होते. ते म्हणाले, गेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान सरकारकडून योजनांची घोषणा करण्यात आली होती. पाच गॅरंटी योजनांची समर्पकपणे अंमलबजावणी केली जात आहे. गृहज्योती योजनेंतर्गत प्रति महिना 200 युनिटपर्यंत वीज मोफत, युवा निधी योजनेंतर्गत पदवीधरांना प्रति महिना 3 हजार बेकार भत्ता, डिप्लोमाधारकांना 1500 रुपये देण्यात येत आहेत. याबरोबरच अन्नभाग्य योजनेंतर्गत 5 किलो तांदळाऐवजी डीबीटीद्वारे पैसे देण्यात येत आहेत. गृहलक्ष्मी योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबातील प्रमुख महिलेला 2 हजार रुपये दिले जात आहेत. तर शक्ती योजनेंतर्गत महिलांना राज्यभरात मोफत बस प्रवास उपलब्ध करून दिला आहे. या योजनांची राज्यभरात अंमलबजावणी करण्यात आली आहे.

सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना गुणात्मक शिक्षण मिळावे याचबरोबर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. शाळांची दुरुस्ती करण्याबरोबरच नवीन शाळाखोल्यांचे कामही हाती घेण्यात आले आहे. कित्तूर राणी चन्नम्मा वसती शाळेचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले आहे. तलाव भरणी, पाणी उपसा योजना आदी अनेक योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. यमकनमर्डी मतदार संघात प्रत्येक गावाला दर्जेदार रस्ते निर्माण करून देण्यात आले आहेत. शहरामध्ये 50 कोटी निधीतून नवीन जिल्हा क्रीडांगण निर्माण करण्याचे कार्य सुरू आहे. पाणी पुरवठा योजनेसह रस्त्यांचा विकास केला जात आहे, असे त्यांनी सांगितले. गॅरंटी योजनांचा सदुपयोग करून घेऊन आर्थिकरीत्या सबल व्हावे, मुलांना उत्तम शिक्षण द्यावे, सरकारच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले. यावेळी आमदार राजू सेठ, जिल्हाधिकारी नितेश पाटील, सीईओ राहुल शिंदे, युवा नेते राहुल जारकीहोळी, डीसीपी रोहन जगदीश, प्रांताधिकारी बसवाणेप्पा कलशेट्टी, तहसीलदार सिद्धराय भोसगी, आरसीयूचे कुलगुरु प्रा. त्यागराज, निबंधक राजश्री जैनापूर, अन्न व नागरी पुरवठा खात्याचे संचालक श्रीशैल कंकणवाडी विविध ग्राम पंचायतींचे सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.