‘इंडिया स्किल्स’मध्ये कर्नाटकाला तिसरे स्थान
विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी : विद्यार्थ्यांकडून 29 पदकांची लयलूट
बेंगळूर : कर्नाटक राज्य आता कौशल्य क्षेत्रात देशात आघाडीच्या दिशेने वाटचाल करत आहे. ग्रेटर नोएडा येथील ‘इंडिया एक्स्पो मार्ट’मध्ये नुकत्याच झालेल्या ‘इंडिया स्किल्स 2025-2’ या राष्ट्रीय स्पर्धेत कर्नाटकने तिसरे स्थान पटकावले. 32 कौशल्य विभागांत झालेल्या या स्पर्धेत 48 स्पर्धकांनी भाग घेतला होता. कर्नाटकने 29 विभागांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
क्लाउड कम्प्युटिंग, सायबर सुरक्षा, मेकॅट्रॉनिक्स, डिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग व बेकरी व व्हिज्युअल मर्चंडायझिंग यासारख्या क्षेत्रांमध्ये कर्नाटकने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. राज्याच्या पथकातील अधिकारी आणि मार्गदर्शक कॅप्टन कौस्तव नाथ यांनी यावर भाष्य करताना, हा निकाल खरोखरच उल्लेखनीय यश आहे. आम्ही प्रतिभा दाखवली आहे, पुढच्या वेळी अव्वल स्थान मिळवण्यासाठी आम्ही अधिक कठोर परिश्रम घेऊ, अशी प्रतिक्रिया दिली.
वैद्यकीय शिक्षण व कौशल्य विकासमंत्री डॉ. शरणप्रकाश पाटील, वरिष्ठ अधिकारी ई. व्ही. रमणरेड्डी, मनोजकुमार मीना, एच. एन. गोपालकृष्ण आणि बी. एस. सुमती यांनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल आभार, मानत असल्याचे ते म्हणाले. कर्नाटक कौशल्य विकास निगमने प्रशिक्षित केलेल्या कर्नाटकातील विद्यार्थ्यांनी 10 सुवर्ण, 6 रौप्य, 6 कांस्य आणि 7 उत्कृष्टता पदकांसह एकूण 29 पदके पटकावली. पदक विजेते आता चीनमधील शांघाय येथे होणाऱ्या ‘वर्ल्ड स्किल्स इंटरनॅशनल’ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करतील.