कर्नाटक-महाराष्ट्राची बससेवा ठप्प
प्रवासी ताटकळत : दोन्ही राज्यांच्या बस फक्त सीमेपर्यंतच धावल्याने गैरसोय
बेळगाव : कर्नाटक सरकारने हिवाळी अधिवेशन बेळगावमध्ये घेतल्याच्या पार्श्वभूमीवर त्याला प्रत्युत्तर म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीने व्हॅक्सिन डेपो मैदानावर महामेळाव्याचे आयोजन केले होते. मात्र, या मेळाव्याला येणाऱ्या नेते आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखले. या पार्श्वभूमीवर कर्नाटक-महाराष्ट्राच्या बसना लक्ष्य केल्याने दोन्ही राज्यांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. परिणामी खबरदारी म्हणून दोन्ही राज्यांतील परिवहन मंडळांनी आपल्या राज्यांच्या हद्दीपर्यंतच बस सोडल्या. महामेळावा रोखल्याने सीमावासियांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याचे पडसाद महाराष्ट्रात व प्रामुख्याने कोल्हापूरमध्ये उमटले. कोल्हापूरहून निघालेल्या कर्नाटकच्या बसवर कोल्हापूर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ‘जय महाराष्ट्र’ असे लिहिले.
तर अथणी जत ही महाराष्ट्राची बस थांबवून कर्नाटकमध्ये या बसवर ‘जय कर्नाटक’ असे लिहिण्यात आले. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून दोन्ही राज्यांच्या परिवहन मंडळाच्या प्रमुखांनी बसेस आपल्या राज्याच्या हद्दीपर्यंतच सोडण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्राहून निघणाऱ्या बस फक्त निपाणीपर्यंत येत असून तेथून पुढे प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. तर सावंतवाडी मार्गे बेळगावला येणाऱ्या बस शिनोळीपर्यंत येऊन थांबत असल्याने तेथून पुढे येण्यासाठी प्रवाशांना पर्यायी व्यवस्था शोधावी लागली. कर्नाटकच्या बस निपाणीपर्यंतच जात आहेत. सोमवारी तरी दोन्ही राज्यांच्या बस फक्त सीमेपर्यंतच ये-जा करत होत्या. याचा फटका प्रवाशांना बसला असून त्यांची बरीच गैरसोय झाली.