For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कर्नाटक-जम्मू काश्मीर अंतिम लढत आजपासून

06:12 AM Feb 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
कर्नाटक जम्मू काश्मीर अंतिम लढत  आजपासून
Advertisement

रणजी स्पर्धेतील अंतिम सामना पहिल्यांदाच हुबळीत

Advertisement

वृत्तसंस्था / हुबळी

2025-26 च्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील येथे मंगळवारपासून यजमान कर्नाटक आणि जम्मू-काश्मीर यांच्यात 5 दिवसांच्या अंतिम सामन्याला प्रारंभ होत आहे. हुबळीच्या क्रिकेट शौकिनांना चुरशीची लढत पाहण्याची संधी या सामन्याने उपलब्ध करुन दिली आहे. सकाळी 9.30 पासून सामना सुरू होणार आहे.

Advertisement

अलिकडच्या दोन-तीन वर्षांच्या कालावधीत जम्मू-काश्मीर संघाचा दर्जा दिवसेंदिवस उंचावत असल्याचे दिसून येतो. जम्मू-काश्मीर संघाने यावेळी प्रथमच रणजी स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. कर्नाटकाने यापूर्वी आठवेळा रणजी करंडकावर आपले नाव कोरले आहे. या सामन्यात कर्नाटकाचे नेतृत्व देवदत्त पडीक्कलकडे तर जम्मू-काश्मीरचे नेतृत्व पारस डोग्राकडे सोपविण्यात आले आहे. या वर्षीच्या रणजी हंगामात कर्नाटक आणि जम्मू-काश्मीर या दोन्ही संघांनी आपल्या कामगिरीत सातत्य राखत अनेक अव्वल संघांना पराभवाचा धक्का देत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली आहे.

राजकोटमध्ये झालेल्या सौराष्ट्रविरुद्धच्या सामन्यात कर्नाटकाला पहिल्या डावात आघाडी घेता आली नसल्याने त्यांना काही गुण गमवावे लागले होते. मात्र उपांत्य फेरीच्या सामन्यात कर्नाटकाने धावांचा डोंगर उभा करुन विजय नोंदविला. कर्नाटकाचे केएल राहुल, करुण नायर, कर्णधार पडीक्कल आणि रविचंद्रन स्मरण यांची फलंदाजी चांगलीच बहरली आहे. राहुलने तीन सामन्यांत 457 धावा तर करुण नायरने 8 सामन्यांत 699, देवदत्त पडीक्कलने 5 सामन्यांत 532 आणि स्मरणने 8 सामन्यांत 950 धावा जमविल्या आहेत. मात्र मयांक अगरवाल अधिक धावा जमविण्यासाठी झगडत आहे.

जम्मू-काश्मीर संघाची गोलंदाजी फलंदाजीच्या तुलनेत अधिक भक्कम वाटते. अकिब नबी हा त्यांचा प्रमुख वेगवान गोलंदाज आहे. अकिब नबीने या वर्षीच्या रणजी हंगामात आतापर्यंत 55 गडी बाद केले आहेत. कर्नाटकाच्या फलंदाजांना फटकेबाजीपासून रोखण्यासाठी आता नबीवर सर्वस्वी जबाबदारी राहील. कर्नाटकाच्या गोलंदाजीची भिस्त प्रामुख्याने प्रसिद्ध कृष्णा, विद्याधर पाटील, विशाख विजयकुमार आणि शिखर शेट्टी यांच्यावर राहील. श्रेयस गोपाल हा कर्नाटकाचा प्रमुख फिरकी गोलंदाज आहे. त्याने या रणजी हंगामात 46 गडी बाद केले असून फलंदाजीत 442 धावाही जमविल्या आहेत.

कर्नाटकाने 2013-14 तसेच 2014-15 या कालावधीत सलग रणजी स्पर्धा जिंकली असून या विजेत्या संघातील केएल राहुल, करुण नायर, श्रेयस गोपाल आणि मयांक अगरवाल हे चार खेळाडू आजही कर्नाटकाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. जम्मू-काश्मीर संघाने यावेळी बंगाल आणि मध्यप्रदेश या बलाढ्या संघांचा पराभव करत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली आहे. कर्नाटकाचा संघ आता नवव्यांदा रणजी करंडकावर आपले नाव कोरण्यासाठी सज्ज झाला आहे. दरम्यान जम्मू-काश्मीर संघासमोर वरच्या फळीतील फलंदाज शुभम खजोरिया आणि वंशराज शर्मा यांच्या दुखापतीची समस्या आजही जाणवत आहे. हा अंतिम सामना शेवटच्या दिवसापर्यंत रंगतदार होईल, अशी अपेक्षा बाळगली जात आहे.

Advertisement
Tags :

.