रत्नशास्त्री ए. एच. मोतीवाला यांना कर्नाटक आयकॉन पुरस्कार
निपाणी : निपाणी येथील सुप्रसिद्ध रत्नशास्त्री व समाजसेवक ए. एच. मोतीवाला यांना कर्नाटक राज्याचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, गृहमंत्री डॉ. डी. परमेश्वर, माजी उपमुख्यमंत्री अश्वत्थ नारायण, श्री श्री प्रकाशनाथ स्वामीजी यांच्या हस्ते गॅरंटी न्यूज या सुप्रसिद्ध वृत्तवाहिनीचा मानाचा ‘कर्नाटक आयकॉन पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. मोतीवाला यांनी रत्नशास्त्रासह समाज सेवेत केलेल्या कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
बेंगळूर येथील ताज वेस्ट या हॉटेलमध्ये पार पडलेल्या सोहळ्यामध्ये ए. एच. मोतीवाला यांचा सन्मान करण्यात आला. पेशाने रत्नशास्त्राr असलेल्या ए. एच. मोतीवाला हे पाचव्या पिढीची वारसदार म्हणून रत्नशास्त्राचे काम करतात. त्यांच्या व्यवसायाबरोबरच त्यांनी समाजसेवेचे बाळकडू जोपासले आहे. दिवंगत रत्नशास्त्री एच. ए. मोतीवाला यांच्याकडून त्यांनी हे बाळकडू घेतले आहे. गोरगरीब, अनाथ गरजू लोकांना नेहमीच सहकार्य करण्याचे हेतूने त्यांनी काम केले आहे. त्यांच्या कामाचा गौरव यापूर्वीही गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत माजी उपमुख्यमंत्री प्रताप सिंह राणे, यांच्यासह विविध राज्यांचे राजपाल व विद्यापीठाकडून झाला आहे.
रत्नशास्त्रासह समाजसेवा या दोन्ही क्षेत्रांमध्ये त्यांनी केलेले निस्वार्थ काम उल्लेखनीय असल्याने हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे. गॅरंटी न्यूजच्या संपादिका राधा हिरेगौडर यांनी विशेष नामांकन जाहीर करत या पुरस्काराची घोषणा केली होती. मान्यवरांचे उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पार पडला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर हे सर्व आपले वडील स्वर्गीय रत्नशास्त्री एच. ए. मोतीवाला यांच्या आशीर्वादाने घडले असून हे त्यांना समर्पित असल्याची भावना ए. एच. मोतीवाला यांनी व्यक्त केली. मोतीवाला यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.