कर्नाटक, गुजरात, हिमाचलप्रदेश विजयी
वृत्तसंस्था / रांची
झारखंडमधील रांची येथे सुरू झालेल्या हॉकी इंडियाच्या 15 व्या उपकनिष्ठ महिलांच्या राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धेतील पहिल्या दिवशी हिमाचलप्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि आसाम यांनी विजयी सलामी दिली. तर तेलंगणा आणि जम्मू काश्मिर यांच्यातील सामना बरोबरीत राहिला.
या स्पर्धेतील क गटातील पहिल्या सामन्यात हिमाचलप्रदेशने राजस्थानचा 7-0 असा एकतर्फी पराभव केला. हिमाचलप्रदेशतर्फे नवनीत कौरने हॅट्ट्रीक साधली तर रियाने 2 गोल तसेच पालक चौधरी आणि सोनम यांनी प्रत्येकी 1 गोल केला. क गटातील दुसऱ्या एका सामन्यात आसामने गोवा संघाचा 7 -1 असा पराभव केला. आसाम संघातील रितीका आणि जोत्स्ना एक्का यांनी प्रत्येकी 3 गोल तर चौरासीयाने 1 गोल केला. गोवा संघातर्फे एकमेव गोल कर्णधार रिद्धी हडपकरने नोंदविला.
ब गटातील सामन्यात कर्नाटकाने केरळचा 3-1 असा पराभव केला. कर्नाटकातर्फे जिवीता, कर्णधार पी. पोनम्मा यांनी शिल्पा कांजन्नावर यांनी प्रत्येकी 1 गोल केला. केरळतर्फे एम. शालिनीने 1 गोल नोंदविला. अन्य एका सामन्यात गुजरातने बंगालवर 3-0 अशी मात केली. गुजराततर्फे कर्णधार आस्था टिंपले तसेच कोमल घाडगे आणि भावना जडेजा यांनी प्रत्येकी 1 गोल केला. मणिपूर संघाने दादरा नगर हावेली दमन-दिवचा 3-0 असा फडशा पाडला. तेलंगणा आणि जम्मू काश्मिर यांच्यातील सामना 2-2 असा बरोबरीत राहिला.