चेंगराचेंगरी प्रकरणी कर्नाटक सरकारवर ताशेरे
उच्च न्यायालयाकडून प्रश्नांची सरबत्ती : स्वयंप्रेरित जनहित याचिका : नोटीस जारी : मंगळवारपर्यंत वस्तुस्थितीचा अहवाल देण्याची सूचना
बेंगळूर : पूर्वसिद्धतेशिवाय आरसीबीच्या विजयोत्सवाचा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले आहे. चेंगराचेंगरीच्या घटना रोखण्यासाठी ‘एसओपी’ असायला नको का?, वैद्यकीय कर्मचारी आणि रुग्णवाहिका व्यवस्था नको का?, असे प्रश्न हंगामी मुख्य न्यायमूर्ती कामेश्वर राव यांनी सरकारला विचारले. चेंगराचेंगरी झाल्यास काय करावे, याची तयारी असणे गरजेचे नाही का?, जखमींना तातडीने इस्पितळात दाखल करू नये का?, मार्गदर्शक तत्वांचे पालन राज्य सरकारकडून झाले काय? अशा प्रश्नांची सरबत्ती करत न्यायालयाने नियोजनातील दुर्लक्षाबद्दल नाराजी व्यक्त केली. न्यायालयाने घटनेसंबंधी नोटीस जारी केली आहे. पुढील मंगळवारपर्यंत वस्तुस्थितीदर्शक अहवाल देण्यासंबंधी सरकारला सूचना देत सुनावणी 10 जूनपर्यंत पुढे ढकलली.
बेंगळूरमधील चेंगराचेंगरी प्रकरणी गुरुवारी उच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेत जनहित याचिका नोंद केली. दुपारी त्यावर सुनावणी करताना सरकारला नियोजनातील त्रुटींबद्दल सरकारला चांगलेच धारेवर धरले. सरकारतर्फे बाजू मांडणारे अॅडव्होकेट जनरल शशिकिरण शेट्टी यांनी युक्तिवाद केला. उच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्यास सरकार कटिबद्ध आहे. आम्ही जनहित याचिकेला आक्षेप घेणार नाही. आरसीबीने 3 जून रोजी आयपीएल अंतिम सामना जिंकला. बेंगळूर पोलिसांनी सुरक्षेची तयारी केली होती. बंदोबस्तासाठी 1,643 पोलीस तैनात करण्यात आले होते. पाण्याचे टँकर आणि केएसआरपी तुकड्यांसह अनेक व्यवस्था केल्या होत्या. बुधवारी देखील 1,600 पोलीस तैनान केले होते, अशी माहिती त्यांनी न्यायलयात राज्य सरकारच्या वतीने सादर केली.
11 जणांचा मृत्यू, 45 जखमी
चेंगराचेंगरीत 56 जण जखमी झाले होते. त्यांच्यापैकी पाच महिला आणि सहा पुरुष मृत्युमुखी पडले. कोलार, कारवार, तुमकूर, यादगीर आणि मंड्या येथूनही लोक बेंगळूरला आले होते. बुधवारी 2.5 लाख लोक बेंगळूरला आले होते. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये फक्त 34,600 जणांसाठी व्यवस्था आहे. 33 हजार जणांनाच तिकिटे दिली जातात. पण बुधवारी अडीच लाख लोक आले होते. इतका भव्य कार्यक्रम झाला तेव्हा पूर्वतयारी काय होती?, असा प्रश्न न्यायालयाने केला. त्यावर उत्तर देताना अॅड. जनरल शशिकिरण शेट्टी यांनी, रॉयल चॅलेंजर्स तिकिटे वाटप करते. ते स्टेडियमची व्यवस्था पाहतात, असे प्रतिपादन केले.
पहाटे चार पासूनच गर्दी
पहाटे 4 वाजल्यापासून बेंगळूरमध्ये लोक येत होते. तीन तासांत चिन्नास्वामी स्टेडियमजवळ गर्दी झाली. परराज्यातील लोकही आले होते, अशी माहितीही शशिकिरण शेट्टी यांनी दिली. तर प्रतिवाद करताना वकील अरुण श्याम यांनी आरसीबीचे खेळाडू राज्यासाठी किंवा देशासाठी खेळत नाहीत. राज्य सरकारने त्यांचा सत्कार करण्याची गरज नव्हती. विधानसौध आणि चिन्नास्वामी स्टेडियम येथे सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामुळे समस्या निर्माण झाली. रुग्णवाहिका कोठे होती?, किती सुरक्षा व्यवस्था होती?, हे सरकारने स्पष्ट करावे. या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी केली. त्यावर प्रतिक्रिया देताना उच्च न्यायालयाने स्वयंप्रेरित जनहित याचिका दाखल केल्याचे स्पष्ट केले.
न्यायालयाने फटकारल्यानंतर आरसीबीविरुद्ध एफआयआर
चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीच्या घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला तर 40 हून अधिक जखमी झाले होते. या घटनेप्रकरणी आरसीबी व्यवस्थापनाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आरसीबी मॅनेजमेंटला पहिला आरोपी बनविण्यात आले आहे. तर डीएनए इव्हेंट मॅनेजमेंट, कर्नाटक राज्य क्रिकेट मंडळ यांना अनुक्रमे दुसरा व तिसरा आरोपी बनविण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध बीएनएसच्या कलम 105, 115, 118 अंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
मॅजिस्ट्रेटची केएससीए, आरसीबीला नोटीस
आरसीबीच्या विजयोत्सवावेळी चेंगराचेंगरीत 11 चाहत्यांचा बळी गेल्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणाची मॅजिस्ट्रेटमार्फत चौकशीचे आदेश दिले. राज्यपालांनीही सरकारला सखोल चौकशी करण्याची सूचना दिली आहे. त्यानुसार गुरुवारी तपासाचे नेतृत्व हाती घेतलेल्या बेंगळूर जिल्हाधिकारी जी. जगदीश यांनी कर्नाटक राज्य क्रिकेट मंडळ (केएससीए), रायल चॅलेंजर्स बेंगळूर (आरसीबी), इव्हेंट मॅनेजर आणि पोलीस आयुक्त बी. दयानंद यांना चौकशी हजर राहण्यासंबंधी नोटीस बजावली आहे. आपण चौकशी करून 15 दिवसांत सरकारला अहवाल देणार आहे. नागरिकांना साक्ष नोंदविण्याची विनंती करत असल्याचे जगदीश यांनी सांगितले.
स्नेहमयी कृष्ण यांच्याकडून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांविरुद्ध तक्रार
चिन्नास्वामी स्टेडियमबाहेरील चेंगराचेंगरी प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते स्नेहमयी कृष्ण यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि केएससीएच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार दिली आहे. बीएनएसच्या कलम 106 अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.
आरसीबीकडून प्रत्येकी 10 लाख रु. मदत
चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना अखेर आरसीबी फ्रॅन्चाईजीकडून प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे. राज्य सरकारने देखील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाखांची मदत देण्याचा निर्णय जाहीर केला होता.
चेंगराचेंगरीतील मृत
चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये यलहंका येथील दिव्यांशी (वय 13), कारवार जिल्ह्यातील रविंद्रनगर येथील अक्षता, बेंगळूरच्या एम. एस. रामय्या कॉलनीतील भूमिक (वय 20), दो•कल्लसंद्र येथील चिन्नय्या शेट्टी (वय 19), यलहंका येथील न्यू टाऊन येथील प्रज्ज्वल (वय 20), यडियुर येथील मनोजकुमार (वय 33), कोलार जिल्ह्यातील सहना (वय 19), चिक्कबळ्ळापूर जिल्ह्यातील चिंतामणी तालुक्यातील श्रवण (वय 21), यादगिरी जिल्ह्यातील शिवलिंग (वय 17), मंड्या जिल्ह्याच्या के. आर. पेठ तालुक्यातील पूर्णचंद्र (वय 32), तामिळनाडूच्या कोईम्बत्तूर जिल्ह्यातील उडमलेपेठ येथील कामाक्षीदेवी (वय 29) यांचा समावेश आहे.
श्वास कोंडल्याने तर काहींचा छातीवर दाब पडल्याने मृत्यू
मृत्यू झालेल्यांची उत्तरीय तपासणी झाल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांकडे हस्तांतर करण्यात आले. बौरिंग इस्पितळात 6 व व्हिक्टोरिया इस्पितळात 5 जणांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. काही जणांचा मृत्यू श्वास कोंडल्याने आणि काहींचा छातीवर दाब पडल्याने मृत्यू झाल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला आहे. एका महिलेच्या शरिरातील हाडे मोडल्याने मृत्यू झाला.