कर्नाटक-गोवा रणजी सामना अनिर्णीत
वृत्तसंस्था / शिमोगा
यजमान कर्नाटक आणि गोवा यांच्यातील रणजी स्पर्धेच्या इलाईट ब गटातील सामना मंगळवारी खेळाच्या शेवटच्या दिवशी अनिर्णीत अवस्थेत संपला. या सामन्यात कर्नाटकाने गोवा संघावर पहिल्या डावात 154 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळविली.
या सामन्यात कर्नाटकाने पहिल्या डावात 371 धावा जमविल्या. त्यानंतर गोवा संघाचा पहिला डाव 217 धावांत आटोपला. गोव्याच्या पहिल्या डावात मोहीत रेडकरने 3 षटकार आणि 3 चौकारांसह 53 तर अर्जुन तेंडुलकरने 1 षटकार आणि 6 चौकारांसह 47 धावा जमविल्या. ललित यादवने 36 धावा केल्या. कर्नाटकाच्या कविरप्पाने 51 धावांत 5 तर अभिलाश शेट्टीने 3 गडी बाद केले. कर्नाटकाकडून गोव्याला फॉलोऑन स्वीकारावा लागला. त्यानंतर गोवा संघाने दुसऱ्या डावात 46 षटकात 1 बाद 143 धावा जमविल्या. सलामीच्या खुटकरने 5 चौकारांसह नाबाद 55 तर अभिनव तेजराणाने 9 चौकारांसह नाबाद 73 धावा जमविल्या.
संक्षिप्त धावफलक: कर्नाटक प. डाव 371, गोवा प. डाव 217, गोवा दु. डाव 1 बाद 143.