For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कर्नाटक उपांत्यपूर्व फेरीत दाखल

06:24 AM Jan 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
कर्नाटक उपांत्यपूर्व फेरीत दाखल
Advertisement

मयांक अगरवाल, पडीक्कल यांची दमदार भागिदारी

Advertisement

वृत्तसंस्था / अहमदाबाद

विजय हजारे करंडक वनडे क्रिकेट स्पर्धेतील मंगळवारी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात कर्णधार मयांक अगरवाल आणि देवदत्त पडीक्कल यांच्या 184 धावांच्या भागिदारीच्या जोरावर कर्नाटकाने राजस्थानचा 150 धावांनी पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. अगरवालने शतक (100) तर पडीक्कलने 91 धावा झोडपल्या. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कर्नाटकाने 50 षटकांत 7 बाद 324 धावा जमविल्या. त्यानंतर राजस्थानचा डाव 38 षटकांत 174 धावांत आटोपला.

Advertisement

कर्नाटकाच्या डावामध्ये पडीक्कल आणि कर्णधार मयांक अगरवाल यांनी 184 धावांची शतकी भागिदारी केली. मयांक अगरवालने 107 चेंडूत 100 तर पडीक्कलने 82 चेंडूत 91 धावा झोडपल्या. या स्पर्धेतील अगरवालचे हे दुसरे शतक आहे. तर पडीक्कलचे या स्पर्धेतील पाचवे शतक केवळ 9 धावांनी हुकले. प्रत्युत्तरादाखल खेळताना राजस्थानचा डाव 38 षटकांत 174 धावांत आटोपला. राजस्थानच्या डावामध्ये कर्नाटकाच्या प्रसिद्ध कृष्णाने 36 धावांत 5 तर श्रेयस गोपाल आणि श्रीशा आचार्य यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.  कर्नाटकाचा या स्पर्धेतील हा सलग सहावा विजय असून ते आता अ गटात 24 गुणांसह पहिल्या स्थानावर आहेत. या गटातील केरळ, झारखंड आणि मध्यप्रदेश यांनी प्रत्येकी समान 16 गुणांसह संयुक्त दुसरे स्थान मिळविले आहे. तामिळनाडू आणि त्रिपुरा यांनी या गटात प्रत्येकी 8 गुण नोंदवित अनुक्रमे पाचवे आणि सहावे स्थान मिळविले आहेत. राजस्थानचा हा स्पर्धेतील पाचवा पराभव आहे.

संक्षिप्त धावफलक: कर्नाटक 50 षटकांत 7 बाद 324 (मयांक अगरवाल 100, पडीकल 91, के. एल. राहुल 25, अजयसिंग व मानव सुतार प्रत्येकी 2 बळी), राजस्थान 38 षटकांत सर्वबाद 174 (प्रसिद्ध कृष्णा 5-36, आचार्य आणि श्रेयस गोपाल प्रत्येकी 2 बळी)

तामिळनाडू विजयी

या स्पर्धेतील झालेल्या अन्य एका सामन्यात तामिळनाडूने त्रिपुराचा 54 धावांनी पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना तामिळनाडूने 50 षटकांत 6 बाद 259 धावा जमविल्या. त्यानंतर त्रिपुराचा डाव 42.4 षटकांत 205 धावांत आटोपला. तामिळनाडूच्या डावात सिद्धार्थने 70 तर बाबा इंद्रजितने 48 धावा जविमल्या. त्रिपुराच्या मुरासिंगने  50 धावांत 2 गडी बाद केले. त्यानंतर त्रिपुराच्या डावात तेजस्वी जयस्वालने 45, मुरासिंगने 43 धावा केल्या. तामिळनाडूच्या गुरूजपनित सिंगने 26 धावांत 6 तर वरूण चक्रवर्तीने 23 धावांत 2 गडी बाद केले. संक्षिप्त धावफलक: तामिळनाडू 50 षटकांत 6 बाद 259, त्रिपुरा 42.4 षटकांत सर्व बाद 205.

झारखंडच्या विजयात शिखर मोहनचे शतक

विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेतील मंगळवारी खेळविण्यात आलेल्या अन्य एका सामन्यात झारखंडने मध्यप्रदेशचा दोन गड्यांनी पराभव केला. या सामन्यात झारखंड संघातील अष्टपैलू उत्कर्ष सिंगने फलंदाजीत 56 धावा झोडपल्या तर गोलंदाजीत त्याने 30 धावांत 3 गडी बाद केले. झारखंड संघातील शिखर मोहनने शानदार शतक (103) झळकविले. या विजयामुळे झारखंडने उपांत्यपूर्व फेरीसाठीचे आपले आव्हान जीवंत ठेवले आहे.

संक्षिप्त धावफलक: मध्यप्रदेश सर्वबाद 277 (रघुवंशी 64, शिवांग कुमार 67, सुशांत मिश्रा 2 बळी, उत्कर्ष सिंग 3 बळी), झारखंड 47.4 षटकांत 8 बाद 278 (शिखर मोहन 103, उत्कर्ष सिंग 56, विराट सिंग 45, कुमार कार्तिकेया व शिवांग कुमार प्रत्येकी 3 बळी).

Advertisement
Tags :

.