बडोदा संघाकडून कर्नाटक पराभूत
वृत्तसंस्था / इंदौर
2024 च्या क्रिकेट हंगामातील येथे सुरू असलेल्या सय्यद मुस्ताकअली करंडक टी-20 स्पर्धेतील सामन्यात बडोदा संघाने कर्नाटकाचा 7 चेंडू बाकी ठेवून 4 गड्यांनी पराभव केला. बडोदा संघातील शाश्वत रावतला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले. त्याने 37 चेंडूत 2 षटकार आणि 7 चौकारांसह 63 धावा झोडपल्या.
या सामन्यात कर्नाटकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्नाटकाने 20 षटकात 8 बाद 169 धावा जमविल्या. त्यानंतर बडोदा संघाने 18.5 षटकात 6 बाद 172 धावा जमवित हा सामना 4 गड्यांनी जिंकला.
कर्नाटकाच्या डावामध्ये अभिनव मनोहरने एकाकी लढत 34 चेंडूत 6 षटकारांसह 56, आर. सिमरनने 35 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 38, कृष्णन श्रीजितने 9 चेंडूत 3 षटकारांसह 22, श्रेयस गोपालने 1 चौकारांसह 11 धावा केल्या. कर्नाटकाच्या डावात 11 षटकार आणि 5 चौकार नोंदविले गेले. बडोदा संघातर्फे कृणाल पंड्या, अतित सेठ यांनी प्रत्येकी 2 तर मेरीवाला आणि आकाश सिंग यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. कर्नाटकाचे दोन फलंदाज धावचित झाले. श्रेयस गोपालने हार्दिक व कृणाल या पंड्या बंधूला लागोपाठच्या चेंडूवर शून्यावर बाद करीत हॅट्ट्रिक नोंदवली. या दोघांना बाद करण्याआधी पहिल्या चेंडूवर त्याने शाश्वत रावतला बाद केले होते.
प्रत्युत्तरादाखल खेळताना बडोदा संघाच्या डावात सलामीच्या शाश्वत रावतने 37 चेंडूत 2 षटकात आणि 7 चौकारांसह 63, भानू पfिनयाने 24 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह 43, शिवलिक शर्माने 21 चेंडूत 2 चौकारांसह 22 आणि सोळंकीने 21 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारांसह नाबाद 28 धावा जमविल्या. बडोदा संघाच्या डावात 6 षटकार आणि 14 चौकार नोंदविले गेले. कर्नाटकातर्फे श्रेयस गोपालने 19 धावांत 4 तर पाटील आणि वैशाख यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : कर्नाटक 20 षटकात 8 बाद 160 (सिमरन 38, श्रीजेत 22, मनीष पांडे 10, श्रेयस गोपाल 18, अभिनव मनोहर नाबाद 56, अवांतर 9, कृणाल पंड्या, अतित सेठ प्रत्येकी 2 बळी, मेरीवाला आणि आकाश सिंग प्रत्येकी 1 बळी), बडोदा 18.5 षटकात 6 बाद 171 (रावत 63, पुनिया 42, शिवलिक शर्मा 22, सोळंकी नाबाद 28, अवांतर 5, श्रेयस गोपाल 4-19, पाटील, वैशाख प्रत्येकी 1 बळी)