दहावीच्या विद्यार्थ्यांनाही ‘कर्नाटक दर्शन’
पर्यटन खात्याकडून आठवीच्या विद्यार्थ्यांपुरती मर्यादित असलेली सहल आता दहावीपर्यंत विस्तारित
बेळगाव : पर्यटन खात्याच्यावतीने प्रतिवर्षी आयोजन करण्यात येणाऱ्या ‘कर्नाटक दर्शन’ सहलीला विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. अधिकाधिक विद्यार्थी सहलीपासून वंचित राहत असल्याने पर्यटन खात्याने आठवीच्या विद्यार्थ्यांपुरती मर्यादित असलेली ‘कर्नाटक दर्शन’ सहल आता दहावीपर्यंत विस्तारित केली आहे. त्यामुळे आठवीबरोबर नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनाही ‘कर्नाटक दर्शन’ सहलीचा लाभ मिळणार आहे. प्रतिवर्षी पर्यटन खात्यातर्फे एससीएसपी, टीएसपी अनुदानातून राज्यातील 31 जिल्ह्यांमधील सरकारी माध्यमिक शाळातील तसेच मोरारजी देसाई निवासी शाळेतील अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘कर्नाटक दर्शन’ सहल आयोजित केली जाते. त्यानुसार यावर्षीही ‘कर्नाटक दर्शन’ सहल होणार आहे. या सहलीमध्ये आता केवळ आठवीच्याच विद्यार्थ्यांचा सहभाग न राहता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनाही सामावून घेण्यात येणार आहे.
मात्र, सरकारने सहलीसाठी विद्यार्थ्यांची मर्यादा दिली आहे. अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यास सर्वांनाच सहलीवर नेणे शक्य होणार नाही. त्यामुळे मागील वर्षी ‘कर्नाटक दर्शन’ सहलीपासून वंचित राहिलेल्या नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना सामावून घेऊन उर्वरित विद्यार्थ्यांची सहलीसाठी निवड करण्यात येणार असल्याचे पर्यटन खात्याने म्हटले आहे. राज्यातील 31 जिल्ह्यांतून आठवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची संख्या 11 हजार 152 (अनुसूचित जाती), 8 हजार 621 (अनुसूचित जमाती) अशा एकूण 19 हजार 773 विद्यार्थ्यांना 2024-25 मधील ‘कर्नाटक दर्शन’ सहलीचा लाभ मिळवून देण्याचा पर्यटन खात्याचा उद्देश आहे.
‘कर्नाटक दर्शन’ सहलीसाठी 11.86 कोटी राखीव
एससीएसपी, टीएसपी योजनेंतर्गत अनुसूचित जाती विद्यार्थ्यांसाठी 6.69 कोटी रुपये व अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी 5.17 कोटी रुपये असे एकूण 11.86 कोटी रुपये ‘कर्नाटक दर्शन’ सहलीसाठी राखून ठेवण्यात आले आहेत.