बिहारसारखी स्थिती
Karnatak Political Crisis मुख्यमंत्री सिद्धरामय्या राजीनामा देणार? राज्यसभेला वर्णी की मुलाला मंत्रीपद? कर्नाटकात बिहार पॅटर्नची शक्यता
गेल्या काही काळापासून कर्नाटकच्या राजकारणात काहीशी अस्वस्थता दिसून येत आहे. त्यातच आता मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी थेट दिल्ली गाठल्याने सर्व काही आलबेल नसल्याचेच चित्र समोर येत आहे.
हिंदुस्थान टाईम्सच्या वृत्तानुसार काँग्रेसने ही बैठक केवळ एक औपचारिकता असल्याचे म्हटले असले तरी, या प्रकरणाची माहिती असलेल्या लोकांनी 'सांगितले आहे की, कर्नाटकातील 'सत्ता हस्तांतरणा'च्या बाजूने हायकमांड असून, सिद्धरामय्या यांच्यासाठी पर्यायी मार्गांची योजना आखण्यात आली आहे.
२०२३ मध्ये कर्नाटकात काँग्रेस प्रचंड बहुमताने सत्तेवर आल्यापासून, पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांमध्ये कुरबुरी सुरु होत्या. पक्षातील मतभेद आणि नेतृत्वबदलाच्या होत असलेल्या मागण्या यासंदर्भातल्या बातम्या अनेकदा समोर आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटक काँग्रेसमधील अनेक आमदार सर्वोच्च पदासाठी शिवकुमार यांच्या बाजूने आहेत.
सिद्धरामय्या बाजूला होणार
मिळालेल्या माहितीनुसार सिद्धरामय्या अखेर बाजूला होऊ शकतात आणि बिहारसारखी रणनीती आखली जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची माहिती असलेल्या लोकांच्या मते, हे महत्त्वाचे पद सोडण्यासाठी काँग्रेस नेतृत्वाकडून मुख्यमंत्र्यांना काय देऊ केले जाऊ शकते, ते खालीलप्रमाणे आहे. व्यक्त होत असलेल्या शक्यतांवरुन सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपद सोडल्यास त्यांच्यासाठी राज्यसभेची जागा त्यांचा मुलगा यतिंद्र याला मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे.
नितीश कुमार यांनी नुकतेच बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन राज्यसभेत प्रवेश केला असून, त्यांचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांना देण्यात आलं. याशिवाय, नितीश यांचे पुत्र निशांत कुमार यांनी पाटणा येथे बिहारचे नवीन आरोग्य मंत्री म्हणून पदभार स्वीकारला आहे. याच राजकिय घटनेची पुनर्रावृत्ती कर्नाटकच्या राजकारणात होऊ शकते.
आता राज्यसभेचा मार्ग का?
२०२३ मध्ये जेव्हा काँग्रेसने कर्नाटक विधानसभा निवडणुका जिंकल्या आणि सिद्धरामय्या मुख्यमंत्री झाले, तेव्हा अनेक वृत्तांनुसार एका पर्यायी सत्तावाटप प्रणालीवर सहमती झाली होती, ज्यानुसार सिद्धरामय्या यांचा अर्धा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर शिवकुमार मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारतील.
असे असले तरीही, नोव्हेंबर २०२५ मध्ये अर्धा कार्यकाळ पूर्ण झाला, पण नेतृत्वात कोणताही बदल झाला नाही. त्या काळी नेत्यांमधील सकाळच्या नाश्त्याच्या बैठकांनी उत्साह वाढवला होता, पण काहीच बदलले नाही . मात्र, ७७ वर्षीय मुख्यमंत्र्यांसाठी आता राज्यसभेत नवीन जागा निर्माण झाली आहे, कारण जूनमध्ये कर्नाटकातून खर्गे यांच्या जागेसह चार जागांवर निवडणुका होणार असून, त्यापैकी किमान तीन जागांवर विजय मिळवण्याचा काँग्रेसला विश्वास आहे.