कर्ण शर्मा क्रिकेटमधून निवृत्त
वृत्तसंस्था, लखनौ
भारताचा 38 वर्षीय फिरकी गोलंदाज कर्ण शर्माने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली. उत्तरप्रदेश टी-20 लीग स्पर्धेतील सामन्यानंतर कर्ण शर्माने निवृत्तीचा निर्णय घेऊन सर्वांना चकीत केले. या सामन्यात मीरत मॅव्हेरिक्सने कानपूर सुपरस्टारचा 9 गड्यांनी पराभव केला.
कर्ण शर्माचा जन्म उत्तरप्रेशदमधील मीरत येथे झाला. त्याने 14 वर्षाखालील वयोगटात उत्तरप्रदेश संघाचे प्रतिनिधीत्व केले. त्यानंतर त्याने 2007 साली प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आपले पदार्पण रेल्वे संघाकडून केले. 2012-13 च्या क्रिकेट हंगामात त्याने 21 गडी बाद केले. कर्ण शर्माने केवळ रणजी स्पर्धेतील 3 सामने खेळले आहेत. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत 2014 साली कर्ण शर्माला सनरायजर्स हैदराबादने 3.75 कोटी रुपयांच्या बोलीवर खरेदी केले होते. कर्ण शर्माने 1 कसोटी, 2 वनडे आणि 1 टी-20 सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्याने 97 प्रथम श्रेणी सामन्यात 270 गडी बाद केले आहेत. तसेच त्याने 191 टी-20 सामन्यात 168 बळी मिळविले आहेत. आयपीएल स्पर्धेत त्याने तीन विविध संघांचे प्रतिनिधीत्व केले. 2016 साली सनरायजर्स हैदराबाद, 2017 साली मुंबई इंडियन्स, 2018 आणि 2021 साली चेन्नई सुपर किंग्जचे त्याने प्रतिनिधीत्व केले. या कालावधीत कर्ण शर्माच्या सहभाग असलेल्या संघांनी आयपीएलचे जेतेपद मिळविले होते.