कर्मवीरांचा पुतळा, परिसर झाला लख्ख
मावळा कोल्हापूर संघटनेकडून स्वच्छता
बसस्थानक परिसरात टवाळखोरांकडून कचरा
कोल्हापूर
मध्यवर्ती बसस्थानकासारख्या गजबलेल्या परिसरातही कर्मवीर भाऊराव पाटील यांचा पुतळा दुर्लक्षित आहे. पुतळ्याच्या भोवतीने अतिक्रमणाचा वेढा आणि आजुबाजूला कचरा अशी दयनीय अवस्था होती. मावळा कोल्हापूर संघटनेने रविवारी मोहीम हाती घेत हा परिसर लख्ख केला. पाणी मारुन कर्मवीरांचा पुतळा धूळमुक्त केला.
शहरात अनेक महापुरुषांचे पुतळे आहेत, त्यापैकी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात कर्मवीर भाऊराव पाटील यांचा पुतळा आहे. परंतु, गजबलेल्या ठिकाणी असूनसुध्दा कर्मवीरांच्या पुतळयाचा हा परिसर दुर्लक्षित आहे. महापालिकेकडून जयंती आणि स्मृतिदिनीच कर्मवीरांच्या पुतळ्याची स्वच्छता होते. या पुतळ्यावर प्रचंड धूळ साचली होती. तर आजुबाजूला कचरा, दारूच्या बाटल्या, सिगारेटची पाकिटे पडली होती. दुर्गंधीमुळे परिसरात वेगळा दर्प येत होता. मावळा कोल्हापूर या संघटनेने याची दखल घेत रविवारी या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली. कार्यकतर्त्यांनी या पुतळ्याची आणि तेथील परिसराची स्वच्छता केली. या परिसरात नशेबाजी करणाऱ्या टवाळखोरांवर कारवाई व्हावी आणि पुतळ्याच्या परिसराचे सुशोभिकरण करून तो प्रकाशात यावी अशी मागणी संघटनेने केली आहे. उदय फाळके, रमाकांत बिरांजे, विनोद भालकर, विनय काटकर, उमेश पोवार, राजेंद्र चव्हाण, राज विचारे, महेश चित्रुक, रवींद्र कापडे, श्रीनिवास नारिंगकर, युवराज पाटील, मनोज गवळी, ओमकार नलवडे, संतोष हेब्बाळी या मावळ्यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवला तर दत्त पाणीपुरवठा यांनी नि:शुल्क पाण्याचा टँकर दिला.