For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

संन्यास आणि कर्मयोग ह्यापैकी कर्मयोगच सर्वांना सुलभ असल्याने त्याचे महत्त्व जास्तच

06:51 AM Mar 16, 2026 IST | Tarun Bharat Portal
संन्यास आणि कर्मयोग ह्यापैकी कर्मयोगच सर्वांना सुलभ असल्याने त्याचे महत्त्व जास्तच
Advertisement

अध्याय पाचवा

Advertisement

निरपेक्षपणे कर्म करावे की, आत्मज्ञान मिळवण्यासाठी कर्माचा त्याग करून संन्यास घ्यावा ह्यातील कोणती गोष्ट योग्य आहे ह्याविषयी अर्जुनाच्या मनात गोंधळ उडाला होता. म्हणून त्याने ह्यापैकी मी काय करू ते सांगा असे भगवंतांना विचारले. भगवंतांनी कर्म आणि संन्यास ह्याबद्दल त्याच्या मनात उडालेला गोंधळ ओळखला. आता ते अर्जुनाच्या शंकेचे सविस्तर उत्तर देतील. त्यातून, मनुष्य वृत्तीने संन्यासी कसा होतो हे आपल्याला समजेल. संन्यास म्हणजे भगवी वस्त्रs धारण करून काहीही न करता स्वस्थ बसणे अशी लोकांची समजूत असते. प्रत्यक्षात संन्यासी माणसाने वाट्याला आलेले कर्म तर करायचे असते पण कर्म करून मिळालेल्या फळाचा त्याग करायचा असतो. संन्याश्याच्या मनाची अशी तयारी झाली की, मनुष्य वृत्तीने संन्यासी होतो.

अर्जुनाचा प्रश्न ऐकल्यावर, आता हा ताळ्यावर आला असून, युद्ध न करण्याच्या निश्चयापासून मागे हटलेला आहे हे पाहून ह्याला उपदेश करणे योग्य होईल हे भगवंतांच्या लक्षात आले. त्यामुळे संतुष्ट होऊन, त्याच्या प्रश्नाचे उत्तर द्यायला त्यांनी सुरुवात केली.

Advertisement

पुढील श्लोकात ते म्हणतात, कर्म करणे आणि किंवा त्याचा त्याग करणे ह्या पैकी कोणता मार्ग योग्य असे तू विचारत आहेस तर ऐक, हे दोन्हीही मार्ग मोक्षाच्या गावाला जाऊन मिळतात. मात्र या दोहोंपैकी कर्मयोगचे आचरण सर्वांना सहज शक्य असल्याने तो जास्त महत्त्वाचा आहे.

योग संन्यास हे दोन्ही मोक्ष-साधक सारखे । विशेष चि परी योग संन्यासाहूनि मानिला ।। 2 ।।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की, संन्यास व कर्मयोग ह्याबद्दल विचार करून पाहिला तर तात्विकदृष्ट्या दोन्ही मोक्ष प्राप्त करून देणारे आहेत. ज्यांना ही गोष्ट माहित आहे असे जाणते व माहित नसलेले तुझ्यासारखे नेणते या सगळ्यांना हा निष्काम कर्मयोग आचरण्याला सरळ आणि सोपा आहे. जेव्हा नदीच्या पाण्याला प्रचंड ओढ असते तेव्हा नदी ओलांडून पुढे जाण्यासाठी नावेचा वापर करतात. त्याप्रमाणे भवसागरातून तरून जाण्यास कर्मयोग ही योग्य नाव आहे. दुथडी भरून वाहणारी नदी पोहून ओलांडणे सोपे नसते. त्याप्रमाणे संन्यास घेऊन मोक्ष मिळवण्याचा मार्ग सामान्य लोकांना जमण्यासारखा नाही कारण संन्याशाने वाट्याला आलेले कर्म टाळायचे नसून केलेल्या कर्मापासून मिळालेले फळ टाळायचे असते. हे सहजी साध्य होत नाही. त्यासाठी वर्षानुवर्षे कर्मयोगाचे आचरण करून आपल्या मुळच्या स्वभावात बदल घडवून आणावा लागतो. कर्मयोगाचे आचरण करून मिळालेले फळ तात्पुरते आहे हे लक्षात आले की, आपोआपच त्या फळाचे आकर्षण वाटेनासे होते. त्यासाठी कर्मयोगात मुरावे लागते. अशा माणसाला कर्माच्या फळाची अपूर्वाई नसल्याने ते मिळाले काय आणि नाही काय सगळे सारखेच असते. तो नित्य तृप्त असतो.

कर्मयोगात मुरलेला मनुष्य कसा ओळखायचा हे सांगताना भगवंत पुढील श्लोकात म्हणतात, जो कुणाचा द्वेष करीत नाही व कशाची इच्छा करत नाही तो कर्मयोगी कर्मसंन्यासी असतो. तो प्रीति-द्वेष, सुख-दुख, जय-पराजय इत्यादी द्वंद्वांनी म्हणजे परस्परविरोधी भावनांनी रहित असल्याने कर्मबंधापासून कोणत्याही प्रयत्नाशिवाय मुक्त होतो.

क्रमश:

Advertisement
Tags :

.