आत्मज्ञानी माणसाच्यादृष्टीने कर्म, कर्ता आणि परिणाम ही सगळी त्याचीच रूपे असतात
अध्याय चौथा
भगवंत म्हणाले, आत्मज्ञान प्राप्त झालेल्या व्यक्तीला ज्ञानी असे म्हणतात. तो फळाच्या अपेक्षेने कर्म करत नसल्याने केलेल्या कर्माचा दोष त्याला लागत नाही. जे मिळेल त्यात तो संतुष्ट असतो. कर्माचे फळ मिळो अथवा न मिळो त्याला सर्व सारखेच असते. त्यामुळे त्याचा कुणाशी हेवादावा नसतो तसेच त्याला कुणाचा मत्सरही वाटत नाही. त्याची परमानंद घेण्याची ओढ नेहमीच वाढती असते. त्याची विचारसरणी ईश्वरासारखी झालेली असते. त्यामुळे त्याला सर्व माणसे त्याचीच रूपे आहेत असे वाटते. सर्वातून मुक्त झालेल्या माणसाचा स्वभाव त्याला प्राप्त झालेल्या आत्मज्ञानात विलीन झालेला असतो. त्यामुळे तो सहज म्हणून जी जी कर्मे करतो ती त्याच्यातच जिरून जातात. आकाशात अकाली आलेले मेघ ज्याप्रमाणे काही जोर न करता येतात आणि आपोआप जागच्याजागी विरून जातात. त्याचप्रमाणे वेदांनी सांगितलेल्या एकूण एक विधानांचे यथासांग जरी तो अनुष्ठान करत असला तरी त्याच्या ऐक्यभावनेमुळे ती शेवटी त्याच्याच ठिकाणी लय पावतात.
पुढील श्लोकात भगवंत सांगतात, ब्रह्म सर्वव्याप्त आहे आणि ज्ञानी पुरुष ब्रह्मस्वरूप असल्याने तो करत असलेले कर्तव्य म्हणजे ब्रह्माने ब्रह्मप्राप्तीसाठी केलेले कर्म होते. त्यामुळे त्याने केलेले कर्म ब्रह्मात विलीन होते.
ब्रम्हात होमिले ब्रम्ह ब्रम्हाने ब्रम्ह लक्षुनी । ब्रम्ही मिसळले कर्म तेंव्हा ब्रम्ह चि पावला ।। 24 ।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की, हे यज्ञरूपी कर्म व ते करणारा मी, किंवा त्या कर्माचे फळ चाखणारा मी अशा निरनिराळ्या कल्पना त्याच्या मनात येत नाहीत कारण त्याच्यादृष्टीने कर्म, कर्ता आणि परिणाम ही सगळी त्याचीच रूपे असतात. ही सर्व त्याचीच रूपे असल्याने ती त्याच्यातच मिसळून जातात. तो जे जे यज्ञ करतो, त्यातील होमद्रव्ये, मंत्र, इत्यादी सर्व, ती ब्रह्मच आहेत अशा बुद्धीने पाहतो. यज्ञ म्हणजे कर्तव्यकर्म करणे हा अर्थ लक्षात घेतला की, त्याने कर्तव्य कर्म जरी केले तरी अर्जुना ते नैष्कर्म्यच होय.
पुढील श्लोकात भगवंत म्हणतात, देवतांची आराधना करून त्यांना संतुष्ट करून घ्यायचे म्हणून कोणी यज्ञ करतात तर ज्ञानी स्वत: ब्रह्मरूप असल्याने
त्याने केलेला यज्ञ ब्रह्मात विलीन होतो.
देवताराधने यज्ञ योगी कोणी अनुष्टिती । ब्रम्हाग्नित तसे कोणी यज्ञे यज्ञत्व जाळिती ।। 25 ।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, आता देवताराधना म्हणजे काय ते सांगतो. योगी यज्ञाच्या माध्यमातून दैवताची रात्रंदिवस उपासना करतात कारण त्यांना आत्मसुखाची इच्छा असते. सामान्य माणसाला देहसुख महत्त्वाचे वाटत असते. त्यामुळे आपल्या देहाचे कसे होईल, त्याला खायला प्यायला चांगलेचुंगले मिळेल ना, त्याला काही आजार तर होणार नाही ना अशी काही ना काही काळजी सतत वाटत असते. परंतु योग्याला देहाची जोपासना ईश्वरी इच्छेनुसार होत आहे असा पूर्ण विश्वास असल्याने, तो देहाच्या पोषणाविषयी मनात चिंता वहात नाही. आता यज्ञाचा दुसरा प्रकार तुला सांगतो ऐक. जे ब्रह्मरूप अग्नीचे अग्निहोत्री आहेत, ते यज्ञाची यज्ञानेच उपासना करतात. नामदेव महाराजांची मन:स्थिती अशीच असल्याने ते म्हणतात, देह जावो अथवा राहो ।पांडुरंगी दृढ भावो । चरण न सोडी सर्वथा ।आण तुझी पंढरीनाथा । नामावदनी तुझें मंगल नाम । हृदयीं अखंडीत प्रेम । नामा म्हणे केशव राजा । केला पण हा चालवी माझा ।
क्रमश: